Wed, Mar 20, 2019 03:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 37 कोटींचा ‘डेट रेेप’ ड्रग्जचा साठा जप्‍त

37 कोटींचा ‘डेट रेेप’ ड्रग्जचा साठा जप्‍त

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

मलेशियामधून पूर्व आशियायी देशामध्ये चालविण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शुक्रवारी आणि शनिवारी रायगडच्या रसायनी येथील कारखान्यासह नवी मुंबईतील तळोजा आणि कोरपखैरणे येथील गोडाऊनवर छापेमारी केली. या कारवाईत तब्बल 37 कोटी रुपये किमतीचे 265 किलो केटामाईन व मेथाफेटामाईन जप्त करण्यात आले आहे. रेव्ह पार्ट्यांमध्ये सर्रास वापरले जात असलेले हे ड्रग्ज डेट रेप ड्रग्ज म्हणूनही तरुणाईमध्ये ओळखले जाते. 

रसायनी येथील कारखान्यामध्ये छुप्यारितीने केटामाईन व मेथाफेटामाईन हे ड्रग्ज बनविले जात असून बोगस कंपन्यांच्या आधारे डिटर्जन्ट पावडरच्या नावाखाली कंटेनरमधून याचा सप्लाय केला जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआयच्या पथकांनी रसायनी येथील कारखान्यावर आणि त्यापाठोपाठ नवी मुंबईतील तळोजा आणि कोपरखैरणे येथील गोडाऊनवर छापेमारी केली. यात प्रत्येकी 4 किलोचे मोठ्याप्रमाणात प्लास्टिकचे आवरण वापरून तयार केलेली पॅकेट, अशा 50 किलोंच्या बॅगा सापडल्या. यात 253 किलो केटामाईन, तर 12 किलो मेथाफेटामाईन होते. डीआरआयच्या पथकाने हा संपूर्ण ड्रग्जसाठा जप्त करुन तिघांना बेड्या ठोकल्याची माहिती मिळते.

मलेशियामधून चालविण्यात येणार्‍या या ड्रग्ज रॅकेटमध्ये सात जणांचा समावेश असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस कंपन्या स्थापन करून हे ड्रग्ज रॅकेट चालविले जात होते.  यात सायनी येथील कारखान्यामध्ये छुप्यारितीने ड्रग्ज बनविल्यानंतर ते दुर्लक्षित अशा प्रदेशात गोडाऊन भाडेतत्त्वावर घेऊन त्यात साठा केला जायचा. त्यानंतर मागणीनुसार हे ड्रग्ज पुरविण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. रेव्ह पार्ट्या आणि डेट रेप ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणार्‍या या ड्रग्जची मागणीही जास्त असल्याने डीआरआयने ही केलेली कारवाई ड्रग्ज तस्करांसाठी मोठा हादरा ठरला आहे.