Mon, May 20, 2019 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मानखुर्दमध्ये भंगारांच्या गोदामांना भीषण आग 

मानखुर्दमध्ये भंगारांच्या गोदामांना भीषण आग 

Published On: Feb 12 2018 2:25AM | Last Updated: Feb 12 2018 2:25AMमानखुर्द : वार्ताहर

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर मानखुर्द मंडाला विभागातील भंगाराच्या गोदामांना रविवार पुन्हा एकदा भीषण आग लागली. पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान लागलेली आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने यात 17 हून अधिक गोदामांचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या, 10 टँकरच्या सहाय्याने जवानांनी आठ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. हा विभाग ‘कुर्ला स्क्रॅप’ या नावानेही ओळखला जातो. भंगार, रद्दी, काळे तेल, कपडे यांची गोदामे येथे आहेत. तीन महिन्यांपूर्वीच येथे भीषण आग लागली होती. प्लायवूड, कपड्याच्या चिंध्या, प्लास्टिक, ऑईल अशा ज्वलनशील पदार्थांमुळे आग विझवताना जवानांची मोठी दमछाक झाली.  

आगीची भीषणता इतकी होती की घाटकोपर, सायन परिसरातूनही धुराचे लोट दिसत होते. केमिकलमुळे  मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त धूर परिसरात पसरला होता. याचा फटका मानखुर्दमधील रहिवाशांसह मानखुर्द घाटकोपर लिंक वरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुद्धा बसला. घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अग्‍निशमन दलाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने आजुबाजूच्या वस्तीमध्ये आग पसरली नाही. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.