होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  भिवंडीत केमिकलच्या गोदामाला भीषण आग 

 भिवंडीत केमिकलच्या गोदामाला भीषण आग 

Published On: Aug 20 2018 1:49AM | Last Updated: Aug 20 2018 1:17AMभिवंडी :वार्ताहर

तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ज्वलनशील केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. या आगीत लाखो रुपयांच्या केमिकलचा साठा जळून खाक झाला आहे. वेदांता ग्लोबल वेअर हाऊस असे केमिकल साठ्याच्या आग लागलेल्या गोदामाचे नाव आहे. 

ओवळी परिसरात पारसनाथ कॉम्प्लेक्समध्ये एस.के. लांबा यांच्या मालकीच्या केमिकल गोदामाला सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला आग लागली. या आगीमुळे बेकायदेशीपणे साठवून ठेवलेल्या केमिकल ड्रमचे स्फोट होवून हवेत उडू लागले. त्यामुळे सर्वत्र आगीचे लोळ पसरले होते. या गोदामात हायड्रोजन पेरॉक्साइड व सोडियम नायट्रोजन तसेच अन्य प्रकारचे घातक केमिकल साठवण्यात आल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे नागरी वस्तीलाही धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून नागरिकांना आगीपासून दूर जाण्याचा सल्ला दिला. केमिकलच्या धुरामुळे नागरिकांचा श्वास कोंडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

या आगीची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होवून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. मात्र केमिकलच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोळ हवेत पसरत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. घातक केमिकल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने गोदामालगतच्या नागरिकांना धुराचा त्रास होवून श्वास घेण्यास व डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या परिसरातील गावकर्‍यांना घरे बंद करून तसेच इतर गोदामातील कामगारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याची माहिती पोलीस व अग्निशमन अधिकार्‍यांनी दिली आहे.

भिवंडीच्या गोदाम पट्यात 350 हून अधिक बेकायदेशीर केमिकल गोदाम असून या गोदामांना वारंवार आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. केमिकल गोदामे नागरी वस्तीत असल्याने अनेक वेळा प्राणहानी झालेली आहे. मात्र सरकारी भ्रष्ट यंत्रणेमुळे अशा बेकायदा केमिकल गोदामांना सरंक्षण देण्याचे काम सुरूच  आहे. येथील अवैध केमिकल गोदामांचा प्रश्न फक्त आग लागल्याच्या घटनेवरच चर्चेला येत असतो. मात्र आग थंड झाली की हा प्रश्‍नही थंड्या बस्त्यात जातो.