Sat, Dec 14, 2019 02:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करा

मोडकळीस आलेल्या इमारती रिकाम्या करा

Published On: Jul 24 2019 1:40AM | Last Updated: Jul 24 2019 1:40AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहर आणि उपनगरांतील मोडकळीस आलेल्या आणि रिकाम्या करण्यासाठी पालिकेने नोटीस बजावलेल्या आणि या नोटिसीला न्यायालयाकडून स्थगिती मिळविलेल्या इमारतींना उच्च न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. अशा इमारतींमध्ये स्वत: हमीवर राहणे हे धोक्याचेच आहे. स्वत: बरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालण्यापेक्षा या इमारती आधी मोकळ्या करा, त्यानंतर त्यांचे पुनर्वसन अथवा दुरुस्ती करा, असे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करत मोडकळीला आलेल्या इमारतींना पालिकेने बजावलेल्या नोटिसीला यापूर्वी दिलेली स्थगिती उठवली.

मुंबई शहर आणि उपनगरांतीत मोडकळीला आलेल्या इमारती ऐन पावसात कोसळसात आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने अशा इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. या नोटिसीविरोधात काही इमारतीच्या मालकांबरोबरच काही भाडेकरुंनी उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविली होती. पालिकेने धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारती जाहीर करून त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीला देण्यात आलेल्या 50 इमारतींची स्थगिती उठवावी, म्हणून पालिकेच्या वतीने अ‍ॅड रुपाली अधाते यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी काही अर्जांवर मंगळवारी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने धोकादायक इमारतींबाबत चिंता व्यक्त करत अशा जीर्ण इमारती रिकाम्या कराव्यात, असे स्पष्ट करत स्थगिती उठविली.