Fri, Jul 19, 2019 00:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात डान्सबारवाल्यांचा पुन्हा छुपा कप्पा

ठाण्यात डान्सबारवाल्यांचा पुन्हा छुपा कप्पा

Published On: Dec 18 2017 2:38AM | Last Updated: Dec 18 2017 1:33AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

पोलिसांची रेड पडली तर बारबालांना लपवण्यासाठी छुपे कप्पे बनवण्याची पद्धत ठाण्यात मोठ्या प्रमाणात रुळली होती. मात्र पालिकेने अशा छुपे कप्पे बनवणार्‍या बारवर कारवाई मोहीम उघडून ते तोडले होते. त्यानंतर असे छुपे कप्पे बनवणार नाही अशी भूमिका बारचालकांनी घेतली होती. मात्र शनिवारी गुन्हे शाखेच्या पथकाने वागळे स्टेट येथील सिजर पार्क या डान्स बारवर छापा टाकल्यानंतर त्याच छुप्या कप्प्यात बारबालांना लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले. वेळप्रसंगी जीव गुदमरून मृत्यू होईल अशा दाटीवाटीच्या छुप्या कप्प्यातून पोलिसांनी 9 बारबालाना बाहेर काढत त्यांना अटक केली.

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वागळे इस्टेटमधील सिजर पार्क बारमध्ये काही बारबाला अश्‍लील हावभाव करत आणि चाळे सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकास मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर या बारवर शनिवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यावेळी नियमाचे उल्लंघन करत अश्‍लील हावभाव करत नृत्य करणार्‍या 9 बारबाला एका छुप्या कप्प्यात लपून बसलेल्या सापडल्या. पोलिसांनी छापेमारी करताच बारमालक विश्‍वनाथ शेट्टी आणि व्यवस्थापक गणेश शेट्टी यांनी बारबालांना मेकअप रूममध्ये असलेल्या लाकडी कापाटातून जाणार्‍या छुप्या खोलीत लपविले. मात्र पोलिसांनी त्यांना शोधून काढले. यावेळी पोलिसांनी 9 बारबाला आणि बारचालक, बारव्यवस्थापक यांना अटक केली.