Sun, Jul 21, 2019 01:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘पुढारी’ महासर्वेक्षणावर ‘एबीपी माझा’वर रंगला 2 तास सामना

‘पुढारी’ महासर्वेक्षणावर ‘एबीपी माझा’वर रंगला 2 तास सामना

Published On: May 05 2018 10:38AM | Last Updated: May 05 2018 10:22AMमुंबई : प्रतिनिधी

भाजप प्रवक्त्याने आकड्यांवरून केलेली अनुकूल मांडणी आणि त्याला विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आकडेवारीसह दिलेले दणकेबाज प्रत्युत्तर, तसेच आरोप आणि प्रत्यारोपांच्या आतषबाजीत ‘पुढारी  महासर्वेक्षणा’वरील ‘कौल मराठी मनाचा’ ही चर्चा रंगली. ‘एबीपी माझा’ या आघाडीच्या मराठी वृत्तवाहिनीवर हा सामना गुरुवारी रात्री आठ ते दहा या ‘प्राईम टाईम’मध्ये तब्बल दोन तास पहायला  मिळाला. 

राज्यातील सरकार चार वर्षांत स्थिरावलेले नाही, विविध कारणांनी जनता अस्वस्थ आहे, सरकारच्या  कामगिरीवर असमाधानी आहे, असा हल्ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी  केला; त्याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रतिनिधीने पक्ष आणि सरकारच्या बचावासाठी जोरदार प्रतिवाद केला. मात्र त्याचवेळी, सरकारवर बहुतांश जनता  असमाधानी असल्याची स्थिती विचार करायला लावणारी असल्याचे भाजप प्रवक्त्याने मान्य केले. महासर्वेक्षणात जनतेला विचारण्यात आलेले प्रश्‍न, त्याला मिळालेला प्रतिसाद हे अनुक्रमे आधी तीन टप्प्यांत दाखवण्यात आले आणि त्यावर चर्चा घडवून आणली.

राजीव खांडेकर यांनी गेल्या चार वर्षांत राज्य सरकारसमोरील आव्हाने वाढतच असल्याचे वास्तव निदर्शनास आणून दिले. राज्यात हे सरकार स्थिरावलेच नाही. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांत अस्वस्थता आहे. मात्र, रस्त्यावरचे वास्तव व प्रत्यक्ष मतपेटीतून दिसणारे वास्तव यात फरक आहे. ग्रामपंचायत ते इतर सर्वच निवडणुकांत भाजपने यश मिळविले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.

‘महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या भाजप- शिवसेना सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?’ 

या प्रश्‍नावर अतुल भातखळकर  म्हणाले, की 39 टक्के जनताच सरकारवर समाधानी असल्याचा आकडा आमच्या कल्पनेपेक्षा खूपच कमी आहे. ही गोष्ट नक्कीच सरकारला व पक्ष म्हणून आम्हाला विचार करायला लावणारी आहे. नीलम गोर्‍हे यांनी, आकडेवारीकडे बोट दाखवत, बर्‍याच जणांना मुख्यमंत्र्यांचे नाव माहिती असते; पण इतर मंत्री, सत्तांतर काहीही माहिती नसल्याचे सांगितले. हे काठावर पास झालेले सरकार दिसतेय. हे सरकार कशामुळे लोकांना अपयशी वाटतेय, याचा विचार व्हायला हवा, असे त्या म्हणाल्या. राजकीय विश्‍लेषक भय देशपांडे यांनी, गेल्या निवडणुकीच्या वेळी 50 टक्के लोकांनी शिवसेना-भाजपवर  विश्‍वास दाखविला होता. सरकार आल्यानंतर आता हा विश्‍वास 39 टक्के म्हणजे नक्कीच कमी झाल्याच्या महत्त्वाच्या वास्तवाकडे लक्ष वेधले. भाई जगताप यांनी, सरकारवर असमाधानी असलेल्या लोकांचा 61 टक्के हा आकडा मोठा असल्याचे सांगितले.  नि:पक्ष व तटस्थ सर्वेक्षणातून आलेले हे निष्कर्ष आहेत. नेहमीच्या 8-9 हजारांच्या सँपल साईजच्या तुलनेत या सर्वेक्षणात तिप्पट लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत, याचे त्यांनी कौतुक केले.

 नवाब मलिक म्हणाले, की शेतकरी, तरुण वर्ग असे सर्वच घटक सरकारच्या कामगिरीवर असमाधानी आहेत. कुठेतरी लोक नाराज आहेत कारण सर्वच समाज घटकांना झळ बसत आहे. सरकारला वरकरणी वाटतेय किंवा ट्विटरवर भासविले जातेय तितके राज्यातील वातावरण चांगले नाही. त्यामुळेच ‘कमल का फूल, एकही भूल’, अशी आंदोलने आता होऊ लागली आहेत. 

सरकारचा गेल्या चार वर्षांतील कोणता निर्णय अधिक प्रभावी वाटला? 

या प्रश्‍नाला सर्वाधिक लोकांनी ‘जलयुक्त शिवार’, असे उत्तर दिले आहे. त्यावर बोलताना भातखळकर यांनी, सर्वेक्षणाचे मर्यादित महत्त्व असल्याचे मान्य केले. जलयुक्त शिवारसारखी योजना मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन यशस्वी केली. त्यासाठी पाच विभागाच्या योजना एकत्र केल्या. सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांना जनतेने मनापासून साथ दिल्याने ही लोकचळवळ उभी राहिली. त्यामुळे सध्याचे सरकार आमच्याच योजना पुढे रेटतेय, या विरोधकांच्या आक्षेपाला काही अर्थ नसल्याचे भातखळकर यांनी सांगितले. याला शहरी लोकांचाही प्रतिसाद पाहता जलयुक्त शिवार हे केवळ ब्रँडिंगचेच यश आहे, यात शंकाच नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

भाई जगताप यांनीही जलयुक्त शिवार हे ब्रँडिंगचेच यश असल्याचे सांगितले. गेल्या चार वर्षांत राज्यात चांगला पाऊस झाला. त्यातच नाना पाटेकर यांची नाम संस्था, आमीर खान यांच्या पुढाकारामुळे जनतेचा यातील सहभाग वाढल्याचा दावा जगताप यांनी केला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आत्महत्या प्रश्‍नावरून राज्यभर रान पेटविण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. सर्व शेतकर्‍यांच्या बँकेतील याद्या तपासा, सर्वांना फायदा मिळालाय का हे पहा, असे आवाहन ठाकरेंनी केले होते. त्यानंतरही राज्यातील 39 टक्के जनता सरकारच्या या निर्णयावर समाधानी आहे. याबाबत शिवसेनेची भूमिका काय, असा सवाल प्रसन्न जोशी यांनी केला. त्यावर नीलम गोर्‍हे म्हणाल्या, की शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर शिवसेना नेहमीच आग्रही भूमिका घेते. कर्जमाफी हे शिवसेनेच्या आंदोलनाचेच यश आहे. खरेतर, कोणत्याच मुद्द्यावर 50 टक्क्याहून अधिक लोक सरकारवर समाधानी नाहीत. अनेक निर्णयात शिवसेनेला विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे सर्वच मंत्रिमंडळाबाबत जनतेला विश्‍वास वाटत नाही, असे दिसते. 

सरकार कोणत्या प्रश्‍नावर अपयशी ठरले, असे आपणास वाटते? 

या प्रश्‍नावर शेतकरी आत्महत्येबाबत समाज व  लोकमानस कमालीचे संवेदनशील असल्याचे सर्वच  सहभागींनी नमूद  केले. सेवा हमी कायदा, ऑनलाईन  7-12, ई-गव्हर्नन्स यासारख्या मुद्द्यांबाबतही जनता  कमालीची जागरूक असल्याचे  नीलम गोर्‍हे यांनी सांगितले.  महिला अत्याचाराबाबत सरकार उदासीन असल्याचे त्यांनी  सांगितले. बेरोजगारीचा प्रश्‍न  गंभीर असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीसाठी आपण  10 पैकी किती गुण द्याल?  

या प्रश्‍नावर राज्यातील बहुतांश जनतेला  सरकारची  कामगिरी उत्तम, चांगली वाटत असल्याचे समाधान आहे,  असे भातखळकर यांनी पाच ते दहा असे गुण  देणार्‍यांची  बेरीज करून सांगितले. त्यावर निम्म्याहून अधिक जनता  सरकारची कामगिरी सुमार असल्याचे म्हणत  असल्याने  सरकारने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला जगताप व   मलिक यांनी दिला.  मंत्रिमंडळातील कोणत्या मंत्र्याचे  काम प्रभावी  आहे, असे आपणास वाटते?   या प्रश्‍नावरील आकडेवारी पाहत खांडेकर यांनी,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  यांना जनता एकाच तराजूत तोलते का, असा मुद्दा उपस्थित  केला. त्यावर भातखळकर यांनी,  ‘पुढारी’ व चंद्रकांत  पाटील हे दोघेही कोल्हापुरातीलच असल्याने पाटील यांची   लोकप्रियता मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने  आल्याचे विनोदाच्या  सुरात सांगितले. विदर्भाचे जिल्हेही सर्वेक्षणात आले असते,  तर फडणवीस हे खूप अधिक पुढे राहिले असते; तसेच  मुनगंटीवार यांच्या लोकप्रियतेची टक्केवारीही वाढली  असती, असा दावा भातखळकर यांनी केला. 

कोणत्या मुद्द्याचा आगामी निवडणुकीवर प्रभाव  होईल?  या प्रश्‍नाचा प्रतिसाद पाहून मलिक म्हणाले, की देशभरातील पोटनिवडणुकांचा निकाल पाहिल्यास मध्य  प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब या ठिकाणी भाजपला पराभवाला   सामोरे जावे लागले.  यातून मोदींच्या विरोधात मतदान होत  असल्याचे आता दिसून येत आहे.   भाई जगताप यांनी जनतेला प्रश्‍न विचारून आलेली ही  उत्तरे असल्याचे सांगितले. गुजरात हे त्याचे उदाहरण आहे.  जनतेचा विरोध आता दिसतोय, सत्ताधार्‍यांसाठी हा सगळा  आरसा आहे, असे जगताप म्हणाले.  नीलम गोर्‍हे यांनी, नोटा बंदीमुळे जनतेला झालेला त्रास  व गैरसोय, जनतेच्या  मनातील खदखद प्रथमच सार्वजनिक  व्यासपीठावर मांडल्याबद्दल ‘पुढारी’चे अभिनंदन केले.

 शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐरणीवर  आहेत, त्याची दखल यात घेण्यात आली आहे. बँक घोटाळ्यासारखे मुद्दे आम्ही लांबचे समजत  होतो, ते आता यानिमित्ताने  जनतेच्या जिव्हाळ्याचे असल्याचे  दिसून आले. नोटा बंदी आणि जीएसटी हे शिवसेनेचे मुद्दे  नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट  केले.   भातखळकर म्हणाले, की 38 टक्के लोकांनी नोटा  बंदीचा प्रभाव मान्य केला असला, तरी तो चुकीच्या अर्थाने नाही.  निवडणुकीत तो मुद्दा असू शकतो. मात्र, तो नकारात्मक   असू शकत नाही. नोटा बंदीनंतरही आम्ही अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे 2019 ला आम्ही शंभर टक्के   सत्तेवर येऊ, असा विश्‍वास आहे. मलिक म्हणाले, की  राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या आधी निवडणुका   ल्या, तर केंद्रातील भाजप 170 जागांवर येईल आणि  त्यानंतर झाल्या तर 125   आत! संपूर्ण एनडीए दोनशेंच्या  आत येईल, ही वस्तुस्थिती आहे.  

या निवडणुकीत मोदी फॅक्टर प्रभावशाली ठरेल का? 

या प्रश्‍नावर अतुल भातखळकर म्हणाले, 47 टक्के  मतदार जरी मोदी फॅक्टर प्रभावशाली ठरणार नाही असे  म्हणत असला, तरी त्याचा चुकीचा अर्थ घेता येणार नाही.  राज्य शासनाने गेल्या साडेतीन-चार वर्षांत जी कामगिरी  केली आहे, त्याचा विचार मतदार आता करत असेल,  एवढाच काय त्याचा अर्थ निघू शकतो. सुतावरून स्वर्ग  गाठण्याची गरज नाही. भाई जगताप म्हणाले, की मोदी फॅक्टर  आता चालणार नाही, तेच आम्ही म्हणतोय. आता जनतेच्या कौलाची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जर मोदींच्या नावावर भाजपला 123 जागा मिळत असतील, तर आता ते चालणार नाही, हे या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते आहे. अभय देशपांडे यांनी, 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील हवा आता राहिली नाही, हे या सर्वेक्षणातील आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे सांगितले. 

नीलम गोर्‍हे म्हणाल्या, की 2014 च्या विधानसभा निवडणुका मोदींच्या नेतृत्वाखालीच लढविल्या गेल्या होत्या. आता जर 47 टक्के लोक मोदी फॅक्टर चालणार नाही असे म्हणत असतील, तर त्यांना धाडसीच म्हणावे लागेल. हे बदलत्या जनमानसाचे निदर्शक आहे.

आता निवडणूक झाली तर तुमचे मत कोणाला द्याल?

 या प्रश्‍नाला उत्तर देताना सर्वाधिक नागरिकांनी भाजपला आणि त्यानंतर राष्ट्रवादीला पसंती दिली आहे. त्याबाबत  नवाब मलिक म्हणाले, की याआधीच्या अनेक सर्वेक्षणात राष्ट्रवादी काँग्रेस हा चौथ्या क्रमांकावर दाखविला जात होता. आता मात्र आम्ही दोन नंबरवर आलोय. याच पद्धतीने चालत राहिलो, तर आम्ही एक नंबरवर येऊ शकतो. त्यामुळे या सर्वे क्षणात 27 टक्क्यांवर असलेली भाजप 14 ते 15 टक्क्यांवर येईल.

भाई जगताप यांनी, राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा हा परिणाम असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर सुरू असलेले हल्लाबोल आंदोलन यशस्वी ठरले, त्याचे प्रतिबिंब या सर्वेक्षणात उमटले आहे. मात्र, काँग्रेसने राज्यभर शिबिर घेऊन सैन्य तयार करण्याचे काम केले. आता पुढच्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यांत काँग्रेसची आंदोलने सुरू होणार आहेत. आपण 2014 ची आणि आजची परिस्थिती याची तुलना करतोय, आता परिस्थिती बदलतेय, हे स्पष्ट होत असल्याचे जगताप यांनी सांगितले. गोर्‍हे म्हणाल्या, की हे एप्रिल महिन्यातील सर्वेक्षण आहे. निवडणुकांना अद्याप वेळ आहे. मते बदलत असतात.

मुंबई, ठाणे या ठिकाणी शिवसेनेची ताकद मोठी आहे. भाजपच्या बरोबरीत आम्ही आहोत. भाजप-सेनेच्या मतांची एकत्रित बेरीज करण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा केली आहे, त्याची नेहमीच शिवसेनेकडून अंमलबजावणी होत आलीय. मात्र, राजकारणात ‘एव्हरीथिंगइज पॉसिबल’ असते.

भातखळकर म्हणाले, की सरकारच्या कामगिरीवर जरी आधी नाराजी दाखविली असली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना पसंती आहे. त्यामुळे निवडणुका जशा जवळ येतील, तसे चित्र निश्‍चितपणे बदलत जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण व्हावा, असे आपणास वाटते? या प्रश्‍नाच्या प्रतिसादात फडणवीस क्रमांक एकवर, तर  अजित पवार दोनवर आहेत. याबाबत देशपांडे म्हणाले, की  कोणत्या पक्षाचा चेहरा कोणता, यावर मत ठरवले जाते.  

भाजपचा चेहरा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. गेल्या साडेतीन-चार वर्षांत त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप झालेले  नाहीत. त्यांना मिळालेली एक नंबरची पसंती ही त्याचीच पोचपावती आहे. विदर्भातील आकडेवारी असती तर त्यात आणखी फरक पडला असता. जगताप यांनी, सर्वेक्षण कुठल्या काळातील आहे, यावर  पसंतीचा क्रम ठरल्याचे सांगितले. प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या  हल्लाबोल आंदोलनामुळे अजित पवारांच्या चेहर्‍याला दुसर्‍या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. आम्हीही जनतेत जाणार आहोत. या सर्वेक्षणात विदर्भाचा समावेश असता, तर चित्र वेगळे दिसले असते. गेल्या निवडणुकीचा अपवाद वगळता विदर्भाचा कौल हा नेहमीच काँग्रेसच्या बाजूने राहिला असल्याचा दावा त्यांनी केला. 

नीलम गोर्‍हे म्हणाल्या, की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनीही कधीही स्वत: निवडणूक लढविली नाही आणि पदही   स्वीकारले नाही. तीच भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असेल तर आम्ही निश्‍चितपणे त्याचे स्वागत करतो. त्यांना नागरिकांनी तिसर्‍या क्रमांकाची पसंती दिली आहे.

सर्वेक्षणामागची भूमिका

‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी, ‘पुढारी’ व एबीपी-माझा वाहिनीने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणामागची भूमिका चर्चेला सुरुवात करताना स्पष्ट केली. सध्याच्या सरकारचे अजून एक वर्ष बाकी असताना हे सर्वेक्षण करायचे कारण त्यांनी सांगितले. ‘पुढारी’च्या राज्यभरातील प्रतिनिधींना लोकांमध्ये फिरताना आलेले अनुभव अतिशय उत्साहवर्धक आहेत. दै.‘पुढारी’ला 80 वर्षांची परंपरा आहे. या काळात ‘पुढारी’ने जनतेच्या हिताचे अनेक प्रश्‍न मांडले; नुसते मांडलेच नाहीत, तर सोडविलेही. लोकांशी असलेली ‘पुढारी’ची नाळ एक पाऊल पुढे नेणारा विस्तार म्हणजे  वार्ताहर यंत्रणेमार्फत केलेले हे राज्यव्यापी सर्वेक्षण आहे. गेल्या 30 वर्षांत प्रथमच खर्‍या अर्थाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकाच आणि तेही बिगर काँग्रेसी सरकार प्रथमच सत्तेत आहे. अशा स्थितीत गाव पातळीवर, प्रत्यक्ष जनमानसात काय वातावरण आहे, याचा कानोसा घेण्याचा हा प्रयत्न आहे. ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी 25 जिल्ह्यांत गावोगावी, घरोघरी जाऊन लोकांची मते जाणून घेतल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

Tags : survey2018, Kaul Marathi Manacha, daily pudhari, abp majha, survey, maharashtra, politics, Maha Sarvekshan