Fri, Sep 21, 2018 09:32



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहीहंडीचा नियम मोडणारा आवाज

दहीहंडीचा नियम मोडणारा आवाज

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 12:56AM



ठाणे : प्रतिनिधी

दहीहंडी उत्सवात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सर्रासपणे आयोजकांनी मोडत ध्वनिमर्यादेचा भंग केल्याचे सोमवारी दिसून आले. ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावलेल्या दहीहंडी मंडळासह सर्वच प्रमुख मंडळांचा आवाज 80 डेसिबलपेक्षा वर गेल्याची नोंद ध्वनिप्रदूषण विरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी केली. मी स्वतः प्रत्येक ठिकाणी भेट देऊन आवाजाची तीव्रता मोजली असता ती 65 ते 85 डेसिबलच्या घरात होती अशी माहिती डॉ. बेडेकर यांनी पुढारीशी बोलताना दिली. तर पोलिसांनी ध्वनिप्रदूषण नियमांचा भंग अथवा इतर कुठल्याही प्रकारचा एकही गुन्हा सायंकाळपर्यंत दाखल केला नव्हता, अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून देण्यात आली.   

सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाप्रमाणे नागरी वस्तीत साउंड सिस्टीमचा 65 डेसिबलपेक्षा अधिक आवाज असू नये असे आदेश असताना ठाण्यातील सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजकांनी या आदेशाचे सोमवारी सर्रास उल्लंघन केले. पोलिसांनी दहीहंडी आयोजकांना नियम पाळण्याच्या सक्त पूर्वसूचना दिलेल्या असतानाही दहीहंडी मंडळांनी पोलिसांना न जुमानता साउंड सिस्टीमचा आवाज वाढवला. दहीहंडी आयोजकांच्या या मनमानीपणाविरोधात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सार्‍यांचे लक्ष लागलेले असताना पोलिसांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली. ठाण्यातील बहुतांशी दहीहंड्या या राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या होत्या.

त्यात भाजपच्या स्वामी प्रतिष्ठानने आयोजित केलेली हिरानंदानी मेडोज येथील दहीहंडीसह, भगवती शाळेच्या मैदानावर आयोजित मनसेची हंडी, आमदार प्रताप सरनाईक यांची संस्कृती प्रतिष्ठानची हंडी, खासदार राजन विचारे यांची जांभळी नाक्यावरील हंडी, रघुनाथ नगर येथील आमदार रवींद्र फाटक यांची हंडी आणि टेम्भीनाका येथील हंडी आदींचा समावेश होतो. या सर्वच प्रमुख दहीहंडी आयोजकांनी उत्सवावेळी ऑर्केस्ट्रा आणि डीजेचा आवाज घुमवला होता. 

दरम्यान, ऑर्केस्ट्राचा आवाज 60 ते 70 डेसिबल इतका नोंदवण्यात आला, तर ज्या ठिकाणी डीजे होता अशा ठिकाणी आवाज 80 ते 85 डेसिबलच्या घरात होता, अशी माहिती डॉ. महेश बेडेकर यांनी दिली. तर आवाज मर्यादेचा भंग करणार्‍या मंडळांविरुद्ध अद्याप एकही एफआयआर दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून सोमवारी सायंकाळी देण्यात आली.

ठाण्यातील प्रमुख 

दहीहंडी उत्सवात नोंदवण्यात आलेला आवाज
भगवती मैदान (मनसे)
विनाऑर्केस्ट्रा - 60 ते 65 डेसिबल
ऑर्केस्ट्रा - 85 ते 90 डेसिबल
जांभळी नाका (खा. राजन विचारे)
विनाडीजे - 65 ते 70 डेसिबल
डीजे - 80 ते 85 डेसिबल
 टेम्भी नाका (शिवसेना)
विनाडीजे 65 ते 70 डेसिबल
डीजे - 85 ते 90 डेसिबल
संस्कृती प्रतिष्ठान (आ.प्रताप सरनाईक)
विनाडीजे - 65 डेसिबल
डीजे - 85 ते 90 डेसिबल
हिरानंदानी मेडोज (भाजपा)
विनाडीजे - 70 डेसिबल
डीजे - 85 ते 88 डेसिबल