Thu, Apr 25, 2019 13:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील दहीहंडीत कोट्यवधींची लयलूट

ठाण्यातील दहीहंडीत कोट्यवधींची लयलूट

Published On: Sep 02 2018 1:53AM | Last Updated: Sep 02 2018 1:12AMठाणे : खास प्रतिनिधी

ग्लोबल बनलेल्या मराठमोळ्या दहीहंडी उत्सवात स्वामी प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने उडी घेतल्याने सोमवारीदेखील संपूर्ण जगाला चित्तथरारक मानवी मनोरे आणि गोविंदांमधील चढाओढ अनुभवता येईल. स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहा थरांसाठी 25 लाख, तर मनसेतर्फे 21 लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आल्याने दहीहंडी उत्सवातील चढाओढ लक्षवेधी ठरेल. 

टेंभीनाक्यावरील दिवंगत आनंद दिघे यांच्या दहीहंडीने ग्लोबल रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. ग्लोबल दहीहंडी होताना आमदार संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या उत्सवात  गोविंदा पथकांनी दोनदा 9 थरांचे मानवी मनोरे रचून जागतिक विक्रम केला आहे. त्याची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. 

काही वर्षांपूर्वी न्यायालयाने निर्बंध लादल्याने गोविंदांमधील उत्साह मावळला होता, तर अनेक मंडळांनी दहीहंडीचे आयोजन बंद केले. त्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, सचिन आहेर यांच्या दहीहंडीचा प्रामुख्याने समावेश आहे. असे असताना मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाथ जाधव यांनी न्यायालयाची बंदी झुगारत 9 थरांची दहीहंडी लावली. मनसेची ही हंडी भगवती शाळेच्या पटांगणावर होणार असून 10 थरांसाठी 21 लाख, तर 9 थरांसाठी 11 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तर सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याने आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानने वर्तकनगर येथील महापालिकेच्या प्रांगणात प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले  आहे. त्यासाठी 50 लाखांची  बक्षिसे आहेत.  या दहीहंडी उत्सवात भारतीय जनता माथाडी, जनरल कामगार संघाचे अध्यक्ष व स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी हिरानंदानी मिडोज चौकात 25 लाख रुपयांची सामाजिक समरसता दहीहंडी उभारून सर्वांना सुखद धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. 9 थरांसाठी 11 लाख रुपये असून एकूण 50 लाख रुपयांची बक्षिसे आहेत. या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्री हजेरी लावणार आहेत. अशा प्रकारे दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.