Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणूच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

डहाणूच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 13 2018 1:05AM

बुकमार्क करा
डहाणू :  वार्ताहर 

आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे पाचगणी येथील शाँलम इंग्लिश स्कूलमध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आलेल्या डहाणूतील 9 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा गुरुवारी संशयास्पद मृत्यू झाला. राकेश रामा भावर असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी डहाणू प्रकल्प अधिकार्‍यांकडे केली. लेखी हमी घेतल्याशिवाय मृतदेह न हलवण्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गंजाड, मनीपूर येथे तणाव निर्माण झाला होता.

राकेश हा चौथीमध्ये शिकत होता. 9 जानेवारीला राकेशला ताप आल्यानंतर त्याला पाचगणी येथील दवाखन्यात नेण्यात आले. मात्र, शाळा प्रशासनाने याबाबत पालकांना अंधारात ठेवले. 11 जानेवारीला सकाळी 5. 45 वा. राकेशने उलटी केली, त्यामुळे उपचारासाठी त्याला वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शाळा प्रशासनाने त्याच्या पालकांना फोन करून राकेश आजारी असून त्याला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र, ते पाचगणीला पोहचताच त्यांना मुलाचा मृत्यू झाल्याचे कळाले. पालकांनी राकेशच्या मृत्युमागे संशय व्यक्‍त करून शाळेविरुद्ध कारवाईची मागणी केली. 

यापूर्वीही प्रीती सातवी या तिसरीतील आदिवासी विद्यार्थीनीला झोपेमध्ये पडून अपंगत्व आले होते. या प्रकारामुळे गुरुवारी आदिवासींनी उपोषण केले. त्यानंतर लगेचच हा प्रकार समोर आला. संतापलेल्या पालकांनी डहाणू प्रकल्प अधिकार्‍यांना घेराव घालून शाळेविरुद्ध कारवाईची मागणी केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, आ. अमित घोडा, श्यामसुंदर चौधरी यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.