Fri, Aug 23, 2019 23:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दादर ते सीएसएमटी लोकल सेवा उद्या ठप्प राहणार

दादर ते सीएसएमटी लोकल सेवा उद्या ठप्प राहणार

Published On: Feb 03 2018 2:43AM | Last Updated: Feb 03 2018 2:28AMमुंबई :  प्रतिनिधी 

मध्य रेल्वेच्या परळ व करी रोड येथे उभारण्यात येणार्‍या पादचारी पूलाच्या गर्डरच्या कामासाठी रविवारी आठ तासांचा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटी ते दादर या स्थानकांदरम्यानची वाहतूक या कालावधीत पूर्णतः ठप्प राहणार आहे. या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरील वाहतूक रविवारी सकाळी साडे आठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत बंद राहील. तर डाऊन जलद व धीम्या मार्गावरील डाऊन व अप दोन्ही दिशेची वाहतूक सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तास बंद राहील. या कालावधीत सीएसएमटी ते दादर दरम्यान एकही लोकल गाडी चालवण्यात येणार नाही. 

हा विशेष ब्लॉक सुरू होण्यापूर्वी अप जलद मार्गावर दादर येथून शेवटची लोकल सकाळी 8. 12 ला सुटेल. अप धीम्या मार्गावर दादर येथून शेवटची लोकल 9 वाजता सुटेल. डाऊन धीम्या मार्गावर सीएसएमटी येथून शेवटची लोकल सकाळी 9.5 ला सुटेल तर डाऊन जलद मार्गावर सीएसएमटी येथून 9.12 ला सुटेल. ब्लॉक समाप्त झाल्यानंतर दादर येथून अप धीम्या मार्गावर पहिली लोकल 3.35 ला सुटेल, अप जलद मार्गावर पहिली लोकल 4.38 ला सुटेल. सीएसएमटी येथून डाऊन जलद मार्गावर पहिली लोकल दुपारी 3.40 ला सुटेल तर डाऊन धीम्या मार्गावर पहिली लोकल सीएसएमटी येथून 3.50 ला सुटेल.

सीएसएमटी कडे येणार्‍या लोकल या कालावधीत दादर व कुर्ला येथे थांबवण्यात येतील. व तेथूनच डाऊन दिशेने चालवल्या जातील. दादर, कुर्ला व ठाणे येथे समाप्त होणार्‍या व सुरू होणार्‍या फेर्‍या आपल्या निर्धारित वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील. या ब्लॉकचा हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, त्या सेवा नियमितपणे सुरू राहतील. या ब्लॉक व्यतिरिक्त हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही. 

ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्या अगोदरच्या स्थानकात थांबवण्यात येतील. 

रद्द करण्यात येणार्‍या गाड्या 

स  3 फेब्रुवारीला सुटणारी कोल्हापूर-सीएसएमटी सह्याद्री एक्सप्रेस व नागपूर- सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात येतील. 4 फेब्रुवारीला सुटणार्‍या गाड्यांपैकी सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्सप्रेस, सीएसएमटी-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस, सीएसएमटी- मनमाड पंचवटी एक्सप्रेस, सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस व सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 

स  2 फेब्रुवारीला हावडा येथून निघणारी हावडा- सीएसएमटी मुंबई एक्सप्रेसचा प्रवास ठाणे येथे समाप्त करण्यात येईल. चैन्नई येथून 3 फेब्रुवारीला सुटणार्‍या चैन्नई-सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास सुरुवातीला कल्याण येथे थांबवण्यात येईल व त्यानंतर दादर येथे समाप्त करण्यात येईल. 3 फेब्रुवारीला वाराणसी येथून सुटणार्‍या वाराणसी - सीएसएमटी महानगरी एक्सप्रेसला कल्याण येथे थांबवण्यात येईल व त्यानंतर दादर येथे त्याचा प्रवास समाप्त करण्यात येईल. 3 फेब्रुवारीला हैद्राबाद येथुन सुटणार्‍या हैद्राबाद-सीएसएमटी एक्सप्रेसला कल्याण येथे थांबवण्यात येईल व दादर येथे त्याचा प्रवास समाप्त करण्यात येईल.

वेळेत बदल

सीएसएमटी-हावडा एक्सप्रेस सकाळी 11.05 ऐवजी दुपारी 3.35 ला सुटेल. सीएसएमटी- नागरकोईल एक्सप्रेस दुपारी 12.10 ऐवजी 4.25 ला सुटेल. सीएसएमटी- हैद्राबाद एक्सप्रेस दुपारी पावणे एक ऐवजी सायंकाळी 5.10 ला सुटेल. सीएसएमटी-चैन्नई एक्सप्रेस दुपारी 2 ऐवजी सायंकाळी 5.50 ला सुटेल. सीएसएमटी-भुवनेश्‍वर कोणार्क एक्सप्रेस दुपारी 3.10 ऐवजी 3.20 ला सुटेल. सीएसएमटी - हावडा कोलकाता मेल 4 फेब्रुवारीला रात्री साडे नऊ ऐवजी 5 फेब्रुवारीला मध्यरात्री 12.10 ला सुटेल. सीएसएमटी-चैन्नई 4 फेब्रुवारीला रात्री पावणे बारा ऐवजी 5 फेब्रुवारीला मध्यरात्री पावणे एक वाजता सुटेल. सीएसएमटी- वाराणसी महानगरी एक्सप्रेस 5 फेब्रुवारीला मध्यरात्री 12.10 ऐवजी मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल.