Tue, Jul 23, 2019 07:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुरोगामी विचारवंत राज्यात मोकळे फिरू शकत नाहीत

पुरोगामी विचारवंत राज्यात मोकळे फिरू शकत नाहीत

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 1:44AMमुंबई : प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यास दोन्ही तपास यंत्रणांना पूर्णत: अपयश आले आहे. मारेकरी मोकाट आहेत. त्यामुळे आपल्यालाही  त्यांच्याप्रमाणे लक्ष्य केले जाईल, अशी भीती पुरोगामी विचारवंतांच्या मनात घर  करून असल्याने ते समाजात मोकळे वावरू शकत नाहीत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मंगळवारी खंत  व्यक्‍त केली. यापुढे तरी सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणांनी एकत्रित मिळून या हत्यांची चौकशी निष्पक्षपणे करून आरोपींच्या हातात बेड्या ठोकाव्यात, असे खडे बोल तपास यंत्रणांना सुनावले.

गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणार्‍या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे  यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयचे दिल्लीतील सहसंचालक आणि पानसरे प्रकरणात महाराष्ट्राचे गृहसचिव उच्च न्यायालयात जातीने हजर होते. त्यांच्या समोरच न्यायालयाने तपास यंत्रणांच्या कारभाराचे धिंडवडे काढले. यावेळी दोन्ही तपास यंत्रणांनी खुल्या सुनावणीऐवजी चेंबरमध्ये आमची  भूमिका ऐकून घ्यावी, अशी विनंती  न्यायालयाला केली. काही गोपनीय अहवाल सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. मात्र, न्यायालयाने चेंंबरमध्ये म्हणणे ऐकून घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. दोन आठवड्यांत गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.