Sun, May 19, 2019 13:58
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘डी’ गँगचे शूटर भूमिगत!

‘डी’ गँगचे शूटर भूमिगत!

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 1:07AMठाणे : नरेंद्र राठोड

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला झालेली अटक आणि त्यानंतर ठाणे पोलिसांनी डी कंपनीविरोधात उघडलेल्या कारवाई मोहिमेचा धडाका यामुळे संपूर्ण डी कंपनी हादरली असून मुंबईतील भलेभले शूटर अंडरग्राऊंड होऊ लागले आहेत. विदेशात बसलेल्या कंपनीच्या सूत्रधारांनी मुंबईतल्या शूटरांना भूमिगत होण्याचे आदेश दिल्याने गेल्या काही वर्षांत मुंबई-ठाणे परिसरात निर्भीडपणे वावरणारे डी कंपनीचे शूटर इक्बाल कासकरच्या अटकेनंतर रातोरात अंडरग्राऊंड झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे येत आहे. दरम्यान इक्बाल खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले शार्प शूटर शम्मी आणि गुड्डू यांच्यासह डझनभर गुंड अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. 

ठाणे पोलिसांनी डी कंपनीच्या काळ्या धंद्याविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे शूटर मंडळी अंडरग्राऊंड झाली असून त्यांना शोधण्यासाठी बरीच दमछाक करावी लागत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 

गेल्या पंधरा वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात काही गँगस्टरांचा शिरकाव झाला. त्यात आघाडीवर होती कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची टोळी. दाऊद इब्राहिमने आपला भाऊ इक्बाल आणि इतर हस्तकांमार्फत बड्या बिल्डरांना टार्गेट करून त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा धंदा सुरूच ठेवला. पोलिसात तक्रार करूनही जास्त काही उपयोग होत नाही हा अनुभव बिल्डरांना असल्याने त्यांनीदेखील दाऊदच्या धमक्यांना भीक घालत त्याच्या मागण्या पूर्ण केल्या. परंतु याच दरम्यान एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची ठाणे पोलीस दलात वर्णी लागली आणि दाऊदच्या भावाविरोधात ठाण्यातील पहिला खंडणीचा गुन्हा कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. 

त्यानंतर ठाणे पोलिसांनी डी कंपनीविरोधात कारवाईचा धडका सुरूच ठेवत इक्बाल कासकरविरोधात तीन खंडणीचे गुन्हे दाखल केले. तसेच दाऊद गँगसाठी काम करणार्‍या मुमताज शेख, इसरार सैय्यद, पंकज गांगर, तारिक परवीन अशा हस्तकांना गजाआड केले. तर दाऊद गँगशी संबंधित असलेल्या जाहिद अली काश्मिरी आणि संजय बिपिन श्रॉफ या ड्रॅग सप्लायर्सनादेखील नुकतीच अटक केली. या ड्रग सप्लायर्सवर ठाणे पोलिसांनी गेल्या अनेक दिवसांपासून करडी नजर ठेवली होती. मात्र हद्दीचा उद्भवणारा प्रश्न आणि रंगेहाथ पकडण्यासाठी लागणारे पुरावे याच्या प्रतीक्षेत असलेल्या ठाणे पोलिसांनी अखेर गुरुवारी दोघांना ठाण्यातील साकेत रोड येथून अटक केली. 

या दोघांकडे दाऊद गँगशी संबंधित माहिती आहे त्यामुळे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांना त्यांनी या दोघांकडे त्याच दिशेने चौकशी केली अन् दोघांपैकी जाहिद याने दाऊदचा शार्पशूटर नईम फईम खानच्या घरात एके-56 रायफलसह मोठा शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती उघड केली. त्यानंतर प्रदीप शर्मा व त्यांच्या पथकाने बांगूर नगर येथील नईमच्या घरातून एके-56 रायफलसह तीन मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 9 एमएमची दोन पिस्तुले असा शस्त्रसाठा जप्त केला. या घटनेनंतर संपूर्ण डी कंपनी हादरली आहे. 

डी कंपनीवर करडी नजर

ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी डी कंपनीच्या अनेक हस्तकांवर करडी नजर ठेवली आहे. त्यापैकीच एक म्हणजे नुकताच अटक करण्यात आलेला जाहिद अली काश्मिरी हा होय. जाहिद दाऊद गँगशी संबंधित असून त्याच्याकडे बरीच माहिती दडलेली असल्याची माहिती शर्मा यांना होती. म्हणून शर्मा यांनी सीडीआर आणि मोबाईल लोकेशनद्वारे जाहिदच्या हालचालींवर नजर ठेवली होती. नागपाडा येथे राहणारा ड्रग सप्लायर जाहिद हा डी कंपनीशी संबंधित आहे. त्याची नागपाडा भागात काश्मिरी अपार्टमेंट नावाची स्वतःची बिल्डिंग आहे. जाहिदला व्यायामाची हौस असल्यामुळे त्याने तिथेच स्वतःची जिमदेखील सुरू केली होती. याच दरम्यान जाहिद हा नशेच्या आहारी गेला आणि तो स्वतः देखील ड्रग सप्लायर बनला.

याच दरम्यान जाहिदचा मित्र आणि दाऊद गँगचा शार्पशूटर नईम खान हा एका खुनाच्या प्रयत्नात जेलमध्ये गेला आणि जाहिद हा नईमची पत्नी यास्मिन हिला आर्थिक मदत करू लागला. कधीकाळी दीपाली सुर्वे नाव असलेली मराठी मुलगी नईम खानच्या संपर्कात आली आणि यास्मिन बनली. यास्मिनला 16 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी आहे. नईम जेलमध्ये गेल्यापासून ती जाहिदकडून आर्थिक मदत घेत होती. आर्थिक मदतीच्या बदल्यात जाहिद यास्मिनच्या घरात ड्रग लपवून ठेवत होता. तसेच नईम पकडला गेल्यानंतर त्याच्या घरात लपवलेली एके-56 रायफलदेखील जाहिद यानेच गायब करीत दुसर्‍या ठिकाणी लपवून ठेवली होती.