Thu, Jul 18, 2019 15:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डी कंपनीचा शार्प शूटर नईम खान ठाणे पोलिसांच्या कस्टडीत

डी कंपनीचा शार्प शूटर नईम खान ठाणे पोलिसांच्या कस्टडीत

Published On: Jul 14 2018 6:47PM | Last Updated: Jul 14 2018 6:47PMठाणे : नरेंद्र राठोड

दाऊद इब्राहिम गॅंगचा शूटर नईम खान याच्या गोरेगाव येथील बांगुर नगरातील घरातून एके 56 रायफलसह शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने जप्त केला होता. या नंतर हा शस्त्रसाठा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला गेला याचा तपास ठाणे पोलिसांनी सूरु केला आहे. दरम्यान, या शस्त्रसाठ्याशी संबंधित गुपिते नईम खान यालाच माहिती असल्याने त्याचा ताबा मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर शनिवारी ठाणे न्यायालयातून नईम खानचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला. नईम खान यास 17 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नईमच्या चौकशीतून  एके 56 रायफलशी संबंधित अनेक रहस्य समोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गॅंगचा कुख्यात शार्प शूटर नईम फईम खान याच्या मुंबईतील बांगुर नगर मधील घरातून एके 56 रायफल, 3 मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 2 नाईन एमएम पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने मागील आठवड्यात शनिवारी हस्तगत केला होता. नईम खान हा एका खुनाच्या गुन्ह्यात जेल मध्ये असून पोलिसांनी त्याची पत्नी यास्मिन नईम खान हिला अटक केली होती. जप्त करण्यात आलेली रायफल आणि इतर शस्त्रसाठा माझ्या लग्नाच्या आधी पासूनचा असून मला त्याबाबत काहीही माहिती नाही असा जबाब यास्मिन पोलिसांना देत असल्यामुळे एके 56 रायफलचे रहस्य काही उलगडत नव्हते. त्यामुळे या शस्त्रसाठ्या बाबत नईम खानची चौकशी करणे गरजेचे झाले असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. नईमचा चौकशी कामी ताबा मिळावा म्हणून ठाणे खंडणी विरोधी पथकाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन शुक्रवारी नईमचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला होता. शनिवारी ठाणे खंडणी विरोधी पथकाने नईम यास ठाणे न्यायालया समोर हजर केले असता त्यास 17 जुलै पर्यन्त पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.