Sun, Nov 18, 2018 21:52



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डी कंपनीचा शार्प शूटर नईम खान ठाणे पोलिसांच्या ताब्यात

डी कंपनीचा शार्प शूटर नईम खान ठाणे पोलिसांच्या ताब्यात

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:46AM



ठाणे : प्रतिनिधी

दाऊद इब्राहिम गँगचा शूटर नईम खान याच्या गोरेगाव -बांगुर नगरातील घरातून एके 56 रायफलसह शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने जप्त केल्यानंतर हा शस्त्रसाठा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला होता याचा तपास ठाणे पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, या शस्त्रसाठ्याशी संबंधित गुपिते नईम खान यालाच माहीत असल्याने त्याचा ताबा मिळवण्यासाठी ठाणे पोलिसांनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर शुक्रवारी मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयातून नईम खानचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला. शनिवारपासून नईमची चौकशी सुरु करण्यात येणार असून त्याच्या चौकशीतून एके 56 रायफलशी संबंधित अनेक रहस्ये समोर येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गँगचा कुख्यात शार्प शूटर नईम फईम खान याच्या मुंबईतील बांगुर नगरमधील घरातून एके 56 रायफल, 3 मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 2 नाईन एमएम पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने मागील आठवड्यात हस्तगत केला होता. नईम खान हा एका खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असून पोलिसांनी त्याची पत्नी यास्मिन नईम खान हिला अटक केली होती. जप्त करण्यात आलेली रायफल आणि इतर शस्त्रसाठा माझ्या लग्नाच्या आधीपासूनचा असून मला त्याबाबत काहीही माहिती नाही असा जबाब यास्मिनने दिल्याने  एके 56 रायफलचे रहस्य काही उलगडत नव्हते. 

त्यामुळे या शस्त्रसाठ्याबाबत नईम खानची चौकशी करणे गरजेचे झाले असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. नईमचा चौकशी कामी ताबा मिळावा म्हणून ठाणे खंडणी विरोधी पथकाने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन शुक्रवारी नईमचा ताबा ठाणे पोलिसांना देण्यात आला. ठाणे खंडणी विरोधी पथकाने नईम यास मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयातून ताब्यात घेतल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी दिली.