कोरोनानंतर मुंबईवर ‘निसर्ग’ कोपणार!

Last Updated: Jun 03 2020 8:29AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ आज कोकण व उत्तर महाराष्ट्राला धडकत दक्षिण गुजरातच्या दिशेने प्रचंड वेगाने जाणार आहे. आज अलिबागमध्ये दुपारी एकपर्यंत पोहोचणार आहे. त्याचा मुक्‍काम कोकण व उत्तर महाराष्ट्रात २४ तास राहणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या इशार्‍यानंतर संपूर्ण पश्‍चिम किनारपट्टीवर सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्याप्रमाणे पालघरच्या वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यांना या वादळाचा मोठा धोका असल्याने २१ हजारांवर गावकर्‍यांचे स्थलांतर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.  

तडाखा 'निसर्ग' Live : चक्रीवादळ दुपारी 1 पर्यंत अलिबागला धडकणार

यादरम्यान अनेक ठिकाणी २ जून पासून  वादळी वाऱ्यासह  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दि. ०३ जून ते दि ४ जूनपर्यंत निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात घोंघावणार असून या वादळाचा वेग गुजरात व महाराष्ट्रात येईपर्यंत ताशी १०० ते १२० किमी इतका वाढेल. हे वादळ प्रथमच राज्याची राजधानी मुंबईला मोठा फटका देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.