होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कटिंग चाय’ १ रुपयाने महागला!

‘कटिंग चाय’ १ रुपयाने महागला!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : राजेश सावंत

मुंबईसारख्या मोठ्या शहरात टपरीवरील कटिंग चाय प्यायल्याशिवाय अनेकांची तलपच जात नाही. सकाळी व सायंकाळच्या वेळेत शेकडो लोकांची चहाच्या टपरीवर गर्दी दिसते. पण आता या कटिंग चायसाठी एक रुपया जादा मोजावा लागणार आहे. 6 रुपयाला मिळणारा कटिंग चाय आता 7 रुपये झाला आहे. शुक्रवारपासूनच मुंबईतील सर्व चहा टपर्‍यांसह टी स्टॉलधारकांनी याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

चहाच्या टपरीवर उभे राहून काचेच्या छोट्या ग्लासमधून गरम-गरम कटिंग चहा पिण्यात जो आनंद मिळतो तो सकाळी उठल्यानंतर घेतलेल्या घरातल्या चहामध्ये नसतो. अनेक महत्त्वाच्या चर्चा तर हातात काचेचा ग्लास घेऊन चहा टपरीवरच होतात. त्यामुळेमुंबईत कटींग चायचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. मुंबईत चहा विक्रीचे सुमारे 8 हजाराहून जास्त नोंदणीकृत स्टॉल आहेत. त्याशिवाय टपर्‍यांची संख्या 10 हजाराच्या घरात आहे. दररोज एका स्टॉलवर सुमारे 10 ते 15 हजाराचा गल्ला जमा होतो. मुंबईतील असा एक भाग सापडणार नाही की तेथे चहाची टपरी नाही. दादरसारख्या वर्दळीच्या भागात मध्यरात्रीही चहा पिण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते. दादर पश्‍चिमेला रेल्वे स्टेशनलगत किटली घेऊन उभ्या असलेल्या सुनिल चहावाल्याकडे कटींग मारल्याशिवाय अनेकजण घरी जात नाहीत. अगदी शेवटच्या लोकलने जाणारे चाकरमानीही चहा प्यायल्याशिवाय जात नाहीत. 

मुंबईतील चहाच्या व्यवसायामध्ये राजस्थानी समाज सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आदी भागात महाराणा टी स्टॉल मोठ्याप्रमाणात दिसून येतात. या चहावाल्यांनी मुंबईकरांना एक व्यसनच लावले आहे. त्यामुळे चहा महागली तरी, चहा पिणार्‍यांची गर्दी काही कमी होणार नाही.

मुंबईत 10 ते 12 वर्षापुर्वी मुंबईत कटींग चहा 2 रुपयात मिळत होता. यात वाढ होत आता कटींगसाठी तब्बल 7 रुपये मोजावे लागणार आहेत. काही चहावाल्यांनी चहाचे नामकरण करत, वेगवेगळा दर ठेवले आहेत. उदाहरणार्थ टमटम चहा, गुलाबी चहा, रजवाडी चहा असे नामकरण करण्यात आले आहे. त्यानुसार आता चहाचा दर 1 ते 2 रुपयाने वाढवण्यात आला आहे. चहाच्या वाढलेल्या दराबाबत चंदनवाडी येथील श्री लक्ष्मी टी स्टॉलचे मालक जितेंद्र पाटीदार यांना विचारले असता, साखर, चहापावडर, गॅस, माणसांचा पगार वाढल्यामुळे चहाचे दर वाढवणे चहावाल्यांना भाग पडल्याचे स्पष्ट केले. 

 

Tags : mumbai, mumbai news, Cutting tea, costlier 


  •