Tue, May 21, 2019 12:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २०० च्या नोटांसाठी चलनटंचाई : एसबीआयचा धक्‍कादायक अहवाल

२०० च्या नोटांसाठी चलनटंचाई : एसबीआयचा धक्‍कादायक अहवाल

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:31AMमुंबई : वृत्तसंस्था

200 रुपयांच्या नोटांचा भरणा करण्यासाठी अनेक एटीएम बंद झाल्याने चलन टंचाईच्या झळा निर्माण झाल्याचे यात निदर्शनास आणून देण्यात आले आहे. 200 रुपयांच्या नोटांची वेगाने छपाई केल्यास चलनटंचाई लवकर दूर होईल, असेही यात म्हटले आहे.

चलन तुटवड्यामुळे देशभरात गोंधळ सुरू असताना हा रिसर्च रिपोर्ट आला आहे. मार्च 2018 अखेरपर्यंत 19.4 ट्रिलियन रुपयांचे चलन आवश्यक होते. प्रत्यक्षात 17.5 ट्रिलियन चलनच उपलब्ध असल्याचे या अहवालात म्हटले आहे. डिजिटल व्यवहारांचे प्रमाण फक्‍त 1.2 ट्रिलियन असल्याचा फटकाही बसला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीत 15 हजार 291 अब्ज रुपये एटीएममधून काढण्यात आले. त्यानंतरच्या सहा महिन्यांत 12.2 टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. चलन तुटवड्यामुळे नोटाबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा मात्र फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान, चलनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याकडे सर्वच संबंधित जबाबदार यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनेचे नेते विश्‍वास उटगी यांनी केला आहे. 

चलन तुटवडा नसल्याचा दावा केंद्र सरकार आणि आरबीआयतर्फे केला जात असला तरी संपूर्ण यंत्रणेत तब्बल 70 हजार कोटी रुपयांचा तुटवडा असल्याची धक्‍कादायक माहिती एसबीआय रिसर्चने दिली आहे.

सध्याच्या चलनतुटवड्याचा उगम आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून झाल्याचे हा अहवाल म्हणतो. एफआरडीआय विधेयकामुळे बँकांतील पैसा सुरक्षित नसल्याची अफवा या राज्यांमध्ये पसरली आणि तेथून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेण्यात आला.

देशभरातील 2.2 लाख एटीएमपैकी 80 टक्के एटीएम व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मुंबई महानगर प्रदेशात ़सुमारे दहा हजार तर महाराष्ट्रात सुमारे 60 हजार एटीएम आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र, तेलंगणा, कर्नाटकसह काही राज्यांत एटीएम कोरडी पडली होती.