Sat, Jul 20, 2019 10:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › परखड विचारांनी रंगली ‘सांस्कृतिक आबादुबी’

परखड विचारांनी रंगली ‘सांस्कृतिक आबादुबी’

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 15 2018 12:43AMमुंबई : मयुर खानोलकर

तीन पिढ्यांतील दिग्दर्शक, त्यांचा दृष्टिकोन, निर्माते आणि लेखक यांच्यासमोरील आव्हाने, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि व्यावसायिक गणिते यांची सांगोपांग चर्चा करणारा सांस्कृतिक आबादुबी हा परिसंवाद दिग्गजांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या परखड तसेच ठाम विचारांनी रंगला. डॉ. जब्बार पटेल, पुरुषोत्तम बेर्डे, प्रतिमा कुलकर्णी, संतोष पवार, देवेंद्र पेम, केदार शिंदे, प्राजक्‍त देशमुख, चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव, प्रताप फड, अद्वैत दादरकर यांनी या परिसंवादात आपल्या भूमिका मांडल्या. जितेंद्र जोशी आणि ऋषिकेश जोशी यांनी या सर्वांना बोलते केले. सुरुवातीला डॉ जब्बार पटेल यांनी नाटक, आपण नाटकातून सिनेमाकडे का वळलो याची माहिती दिली. नाटक हा व्यवसाय म्हणून करायचा नव्हता, असे त्यांनी सांगितले. 

चर्चेचा मुद्दा विनोदी नाटकांकडे वळला आणि चर्चेचा सूर विनोदी नाटक चांगले की वाईट याकडे वळला. 1993 ते 2003 या काळात फक्‍त विनोदी नाटकेच का आली, असा ऋषिकेश जोशी यांच्या प्रश्‍नाचा रोख होता. जी नाटके केली ती ठरवून केली नाहीत, असे संतोष पवार यांनी सांगितले. माझा या क्षेत्रातला फारसा अभ्यास नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. विनोदी नाटकांकडे गांभीर्याने पाहिलं गेलं नाही, जे मनापासून करावंसं वाटलं ते केलं, आमच्या नाटकांच्या निमित्ताने गंभीर नाटकं करणारेही हसायला लागले, हे आमचं यश आहे, अशा ठाम शब्दांत केदार शिंदे यांनी आपली बाजू मांडली. ‘सही रे सही’ चे इतके प्रयोग केल्यानंतर आपल्या कलाकृतीचा निर्णय कुणीतरी दुसरा घेणार आहे, याचं वाईट वाटलं, अशी खंतही त्यांनी पुढे व्यक्‍त केली. विनोदी नाटकं करणारे गंभीर नाटकं का करत नाहीत, असा प्रश्‍न विचारला जातो, पण गंभीर नाटक करणारे विनोदी नाटक का करत नाहीत, असा प्रश्‍न का विचारला जात नाही, असा सवाल देवेंद्र पेम यांनी केला.

ठराविक कलाकृती केल्यानंतर अमुक एक प्रकारच्या कलाकृती सादर करणारा कलाकार, असा थप्पा सर्वांकडूनच मारला जातो. मी केलेलं सूर्याची पिल्‍ले हे आशयप्रधान विनोदी नाटक होतं, असं सांगतानाच लोकांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावं असं वाटत असेल तर आधी स्वत:ला गांभीर्याने घ्या, असा सल्‍ला प्रतिमा कुलकर्णी यांनी दिला. काही अभिनेते नाटक करताना सुसाट सुटतात. अनेकवेळा संवाद संहितेबाहरेचे असतात. त्यामुळे नाटक अनावश्यक लांबते. त्याचा दोष दिग्दर्शकावर येतो, असेही कुलकर्णी यांनी सांगतले. अशा अभिनेत्यांना आवरायला हवं, असे त्या म्हणाल्या. तर नाटक म्हटलं की तेंडुलकर, कोल्हटकर हेच लेखक, मग आम्ही कोण असा सवाल संतोष पवार यांनी केला.  

नाट्यक्षेत्रातील वरिष्ठ पिढी आमची नाटकं पहायला येत नाही, अशी तक्रार प्रियदर्शन जाधव याने मांडली. नाटकाच्या प्रचार आणि प्रसाराचे अनेक मार्ग आहेत. पण मराठी नाटक आजही वृत्तपत्रांतील जाहिरातींवर अवलंबून आहे. नाटक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी शोधल्या पाहिजेत आणि त्या साधल्या पाहिजेत, असेही तो म्हणाला. फक्‍त व्यावसायिक नाटकच करायचं, असं ठरवलेलं आहे, असा निर्वाळाच चिन्मय मांडलेकरने दिला. नाटक ओल्ड स्कूल होऊ नये, ते समकालीन असायला हवे, जे सिनेमात चित्रपटात पहायला मिळत नाही, ते नाटकात पहायला मिळायला हवं, असं सांगतानाच युवा नाट्यकर्मी अद्वैत दादरकर याने नाटकाचं कास्टींग आता दिग्दर्शकाच्या हातात राहिले नाही, निर्माता स्टार मागतो, अशी कैफियत मांडली. कोणत्याही गॉडफादरची वाट पाहू नका, तुमच्याकडे जी संहिता आहे, तुमच्या डोक्यात जे काही आहे, त्यावर काम सुरु करा, शोकेस महत्त्वाची आहे, माझ्या नाटकांत कुणीही सेलिब्रेटी नव्हता, असे यासंदर्भात बोलताना पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले. 

टुरटूर च्या यशानंतर एखादं गंभीर, आशयघन नाटक करावं असं वाटू लागल्यानंतरची एक आठवण पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितली. टुरटूर हे नाटक प्रचंड यशस्वी झाले होते. त्या नाटकातून आलेल्या पैशातून सखी प्रिय सखी हे आशयघन नाटक बसवले. अमोल पालेकर आणि प्रिया तेंडुलकर अशी सुरुवातीची जोडी होती. नंतर भक्‍ती बर्वे आणि उदय म्हैसकर आले. 40 जणांचा चमू तयार झाला. पण मोजके प्रयोग केल्यानंतर नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. 1985 साली या नाटकामुळे अडीच लाखांचा तोटा झाला होता. त्याकाळी चित्रपट कलाकारांनी संप केला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेने भरपूर तारखा टुरटूरसाठी दिल्या आणि सखी प्रिय सखीचा तोटा भरुन निघाला, अशी आठवण बेर्डे यांनी सांगितली.a