Mon, Jun 24, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळेतल्या धड्यांचा प्रत्यक्षात वापर; १० वर्षीय झेन बनली देवदूत

शाळेतल्या धड्यांचा प्रत्यक्षात वापर; १० वर्षीय झेन बनली देवदूत

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 23 2018 9:26AMमुंबई : प्रतिनिधी

परळमधील क्रिस्टल इमारतीच्या 12 व्या मजल्याला लागलेल्या आगीत अडकलेल्या 17 जणांचा जीव एका चिमुरडीमुळे वाचला. या आगीत अडकलेल्या कुटुंबातल्या झेन सदावर्ते या चिमुरडीने प्रसंगावधान राखत आपल्या कुटुंबाला आणि अन्य शेजार्‍यांनाही आगीतून सुखरूप बाहेर येण्यास मदत केली. 

शाळेत शिकवलेल्या धड्याचा प्रत्यक्षात अडचणीच्या वेळी वापर करत 10 वर्षीत झेनने इमारतीतील रहिवाशांचा जीव वाचवला. इमारतीतील दोन मजले धुराने वेढले असताना झेनने घरातील कपडे जमवून फाडले आणि ते पाण्याने भिजवले. हे ओले कपडे नाकाशी धरून शांतपणे श्वासोच्छवास करत राहण्याचा सल्ला तिने कुटुंबीयांना व शेजार्‍यांना दिला. असे करत सर्वजण सुखरुप बाहेर पडू शकले.

धुरातल्या कार्बनच्या जास्त प्रमाणामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही आणि श्वास गुदमरू लागतो. मात्र अशा वेळी नाकाला ओले कापड लावून श्वास घेतल्यास खूपच फायदा होतो. ओल्या कपड्यामध्ये धुरातील कार्बन शोषला जातो आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत राहतो. हे विज्ञान झेनने वापरले. आगीतून बाहेर पडत असताना केसही ओले करण्याचा सल्ला तिने दिला होता. 

या आगीतून अग्निशमन दलाच्या जवानांनी 25 रहिवाशांची सुखरुप सुटका केली. यापैकी 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.जे गुदमरून मृत्युमुखी पडले त्या दोघांनी आग लागलेली असतानाही इमारतीची लिफ्ट वापरली आणि मृत्यू ओढवून घेतला. याउलट झेनने मात्र स्वत:चा आणि इतर सर्वांचा जीव वाचवला.