Sun, Jul 21, 2019 14:44
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अडीच हजार श्रीमंतांना क्रिप्टो करन्सीचा गंडा!

अडीच हजार श्रीमंतांना क्रिप्टो करन्सीचा गंडा!

Published On: Jun 06 2018 2:09AM | Last Updated: Jun 06 2018 1:51AMठाणे : खास प्रतिनिधी

अभासी चलनाच्या (क्रिप्टो करन्सी) दुनियेतील मास्टरमाईंड आणि अमेरिकेसह जगातील प्रमुख देशांमध्ये यशस्वी उद्योगपती म्हणून नावाजलेला डॉ. अमित लखनपाल हा फक्त आठवी शिकला आहे. त्याने मुंब्र्यातील एका तरूणाकडून सॉफ्टवेअर विकसित करून घेतले आणि अवघ्या दहा महिन्यात देशभरातील अडीच हजार गर्भश्रीमंत गुंतवणूकदारांना सुमारे 500 कोटींचा गंडा घालून दुबईला पळून गेला. त्याच्या नावावर डेबिट कार्ड, ऑनलाईन शॉपिंग, रिअर इस्टेटसह विविध 13 कंपन्या असून त्याला ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मदत केल्याचे समोर आले आले. एवढेच नाही तर मनी ट्रेड कॉईनशी संबंध आलेल्या बॉलिवुडमधील स्टार, राजकारणी, काही गायकांचीही चौकशी केली जाईल, असे ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मनी ट्रेड कॉईनचे आमिष दाखवून ग्राहकांना गुंतवणुकीच्या पाचपट मोबदला देणार्‍या फ्लिनस्टोन ग्रुपच्या ठाणे आणि विक्रोळीतील कार्यालयावर छापे घालून आरोपी तहा हाफीन काझी (26) याला अटक केली आहे. मुंबई, ठाण्यात सप्टेंबर 2017 पासून सुरू झालेल्या कंपनीच्या या कार्यालयांवर छापे घालून पोलिसांनी 53 लॅपटॉप, शिक्के, मोबाईल व बनावट दस्तावेज हस्तगत केला. आरोपी तहा काझी हा मुंब्र्यातील रहिवाशी असून  त्याने पनवेलमधूल संगणक सॉक्टवेअरचा डिप्लोमा घेतला आहे. याच काझीने या घोटाळाचा मुख्य सूत्रधार अमित लखनपाल याला मनी ट्रेड कॉईनच्या व्यवहारासाठी खास सॉप्टवेअर तयार करून दिल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. या घोटाळ्यातील दुसर्‍या सूत्रधार सचिन वसंत शेलार हा अंबरनाथचा रहिवासी असून त्याच्यासह कोमल भिमराव सिरसाट, विक्रम भंगेरा या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 पाच महिन्यात सहापट मोबादला देण्याचे आमिष दाखविताना अमित लखनपालने सॉफ्टवेअरच्या मदतीने बाजारातील आभासी चलनाचा कृत्रिम भावही वाढविला होता. मात्र कुठल्याही गुंतवणूकदाराला चलनाची विक्री करण्याचे अधिकार नव्हते. एकदा पैसा गुंतवला की तो पुन्हा आपल्या मर्जीप्रमाणे काढता येत नसे. गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी राजघराणे, रॉयल कुटुंब, राजकीय नेते, आंतरराष्ट्रीय नेते, सेलिब्रेटिज यांच्यासोबतच्या छायाचित्रांचा वापर करीत असे. अमित लखनपालवरी आत्मचरित्रात अनेक नामी हस्तींचे छायाचित्रेही आहेत. एवढेच नाही तर जगप्रसिद्ध फोर्ब्स या मॅग्झिनमध्येही त्याची मुलाखत छापून आलेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्‍वास अधिक वाढत गेला आणि कुणी 35 कोटी, तर कुणी 50कोटी रुपयांची रोखीने गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. एवढी गुंतवणूक करूनही काही हाती लागत नसल्याचे लक्षात आल्यावर एक दिल्लीतील एका फसलेल्या गुंवतवणूकदाराच्या तक्रारीवरून चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि हा घोटाळा उघडकीस आल्याचे त्यांनी सांगितले.

हा आरोपी एवढा चाणाक्ष आहे की पोलिसांना आपल्या गैरव्यवहाराची कुणकुण लागल्याचे लक्षात येताच आपल्या एजंटने कंपनीत घोटाळा केला असल्याची लेखी तक्रार चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करून आपण त्यातले नाहीच, असे भासवण्याचे प्रयत्न केले. त्याने कंपनीचे डेबिट कार्ड तयार केले असून ऑनलाईन शॉपिंग कंपनीही सुरू केलेली आहे.

 फ्लिनस्टोन कंपनीने  105 मिलियन कॉईनपैकी 20 मिलियन म्हणजे दोन कोटी रुपये बाजारात आणले. अभासी चलन भारतात चालत नसताना आमिषाला बळी पडून गुंतवणूकदारांनी रोखीने व्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.  सुमारे 500 कोटी रुपये लूटून दुबईला पोबारा करणार्‍या अमित लखनपालकडून ग्राहकांना फोनद्वारे धमकावले जात असून लवकरच त्याला फरार घोषीत करून ताब्यात घेतले जाईल, असे आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितले. हा घोटाळा ठाणे गुन्हे अन्वेष विभाग युनिट एकचे वरिष्ठपोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पो.निरीक्षक रणवीर बयेस, अविराज कुराडे, संदीप बागुेल, समीर अहिरराव व त्यांच्या पथकाने उघडकीस आणला.