Sat, Jan 19, 2019 10:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुळाला तडा; मरे विस्कळीत

रुळाला तडा; मरे विस्कळीत

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:28AM

बुकमार्क करा

आसनगाव : वार्ताहर 

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील आटगाव-तानशेत स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर रुळाला तडा गेल्याने डाऊन मार्गावरील वाहतूक मंगळवारी तब्बल दीड तास ठप्प झाली होती. सकाळी 9:30 च्या सुमारास पोल क्रमांक 98/22 याठिकाणी हा प्रकार घडला. या मार्गावर काम करणार्‍या ट्रॅकमन सोमा थोरात यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी या मार्गावरून धावणार्‍या भागलपुर एक्सप्रेसला लाल झेंडा दाखवून एक्सप्रेस थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. या घटनेमुळे नाशिकच्या दिशेने जाणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला, तर एक कसारा लोकल रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. 

तडा गेलेल्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था केल्यानंतर तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरू झाली. या दरम्यान भागलपूर एक्सप्रेस, पुष्पक एक्सप्रेस या लांबपल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला. तर आसनगावर स्थानकातून 10.09 ची कसारा लोकल रद्द करून आसनगावहुन सीएसटीला रवाना करण्यात आली. 

दरम्यान, या कामासाठी रात्रीच्या वेळी  ‘ब्लॉक’ घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेची लोकल सेवा सध्या मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत असून, दररोज तांत्रिक बिघाडांची भर पडत आहे. इच्छितस्थळी उशिराने पोहोचणार्‍या लोकलमुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी लेटमार्क मिळतो, त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.