होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रातील नागरिक गुजरातला जाऊन पेट्रोल भरतात!

महाराष्ट्रातील नागरिक गुजरातला जाऊन पेट्रोल भरतात!

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 9:31AMबोर्डी : वीरेंद्र खाटा

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने डोकेवर काढल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच पेट्रोलच्या दरामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या शेजारच्या राज्यात कमालीची तफावत आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सीमाभागातील नागरिक थेट गुजरातला जाऊन पेट्रोल भरत असल्याने डहाणू, तलासरीतील पेट्रोलपंपचालकांना त्याचा फ टका बसत आहे. 

आपल्याकडे डिझेलचा प्रतिलिटर दर 70.23 रुपये आहे, तर गुजरातला 68.29 रुपये प्रतिलिटर दराने डिझेल मिळत आहे. विविध करांची अधिक आकारणी केली जात असल्याने गुजरातच्या तुलनेत मुंबई आणि लगतच्या भागात पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे 8 रुपयांनी अधिक आहे. डहाणू तालुक्यात दहा आणि तलासरीत पाच असे एकूण पंधरा पेट्रोलपंप आहेत. या दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्यातील अनेक ग्राहक, रिक्षाचालक तसेच अन्य वाहतूकदार थेट गुजरात गाठून पेट्रोल भरण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचा थेट परिणाम तलासरी, डहाणूतील पंपचालकांच्या उत्पन्नावर होत असून, महाराष्ट्र महाग आणि गुजरात स्वस्त या विचित्र न्यायाने पंपचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त असल्याने आम्ही सीमा भागातील बहुतेक रिक्षाचालक पेट्रोल भरण्यास उंबरगाव (गुजरात) येथे जातो. - जयेश भंडारी, रिक्षाचालक

सीमा भागातून दररोज कामानिमित्त मोटारसायकल घेऊन गुजरातच्या औद्योगिक क्षेत्रात जातो. येथे पेट्रोल भरल्यास आमचे लीटरमागे 8 रुपये वाचतात. - कृष्णा दांडेकर, प्रवासी