Sun, Mar 24, 2019 10:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आदिवासी प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा

आदिवासी प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा

Published On: Jul 01 2018 2:16AM | Last Updated: Jul 01 2018 1:36AMडहाणू : वार्ताहर

आदिवासींच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू विभागात सन 2012 ते 2015 या तीन वर्षांच्या काळात आदिवासी विकास योजनेत  तब्बल 1 कोटी 65 लाख 45 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणी कृषीरत्न कातकरी फळे, फुले भाजीपाला औषधी शेती संस्था मर्यादित नानिवली आणि कातकरी आदिम विकास संस्था नानिवली या दोन संस्थाचे अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांविरोधात डहाणू पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या वतीने राबवण्यात आलेल्या विहीर योजनेच्या व आदिम कातकरी समाजाच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी राबवलेल्या घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रदान केलेल्या निधीचा गैरवापर झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.तब्बल 1 कोटी 65 लाख 45 हजार रुपयांचा निधी कागदावर खर्च झाला. मात्र, प्रत्यक्षात त्या योजना गरजू आदिवासींपर्यत पोहोचल्याच नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच्या चौकशीअंती संबंधित दोन्ही संस्थांनी  घरकुल आणि विहिरींबाबतच्या कामाची पूर्तता केली नसल्याचे व शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावटीकरण केल्याचे दिसून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, प्रकरणामुळे आदिवासी विकास विभागातील भ्रष्ट कामांची चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ठक्कर बाप्पा योजनेचे चौकशी करण्याची मागणीही जोर धरत आहे.

शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू , तलासरी, वसई या चार तालुक्यांतील आदिवासींचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी डहाणू येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यरत आहे. येथील आदिवासींसाठी असलेल्या विविध योजना सेवाभावी संस्थांकडून राबवले जातात. सन 2012 ते 2015 या काळात कृषीरत्न कातकरी फळे, फुले, भाजीपाला, औषधीशेती संस्था मर्यादित आणि कातकरी आदीम विकास संस्था यांना कामे देण्यात आली. दरम्यान, दोन्ही संस्थांच्या अध्यक्षांनी पदाधिकार्‍यांच्या संगनमताने चुकीचा अहवाल सादर केला. ही कामे कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात या योजनेचा बोजवारा उडाल्याने संबंधित योजनेत शासनाकडून गरीब लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या योजनेचा लाभ न देता शासनाची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी पैशांचा अपहार केल्याप्रकरणी डहाणू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आदिवासी विकास विभागाचा गैरकारभार उघडकीस आला आहे.