Fri, Sep 21, 2018 11:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्यंगचित्रातून काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांवर फटकारे

व्यंगचित्रातून काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांवर फटकारे

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून मुख्यमंत्री त्यांची सातत्याने पाठराखण करत आहेत. या विरोधात प्रदेश काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप सरकारचे वाभाडे काढले आहेत. काँग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात बोलताना भ्रष्टाचाराच्या पर्वतावरून मुख्यमंत्री पारदर्शक गप्पा मारत असल्याचा टोला लगावला आहे.

सरकारची अब्रू वाचविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वांना क्लीन चिट देतात. तसेच चौकशी समिती, एसीबी आणि पोलीस यंत्रणा या त्यासाठी सरकारला मदत करत असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून केला आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मुख्यमंत्र्यांनी अगोदरच दिलेली क्लीन चिट व आता बाळगलेले मौन या सरकारचा दांभिकपणा आणि भ्रष्टाचाराला असणारा पाठिंबा अधोरेखित करणारे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी अनधिकृत बंगलाप्रकरणी सुभाष देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर बोलणे टाळले आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने भाजप सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारावर हल्ला चढविला आहे.