होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिका अधिकार्‍यांवर होणार फौजदारी कारवाई? 

पालिका अधिकार्‍यांवर होणार फौजदारी कारवाई? 

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 12 2018 1:41AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिलमधील वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेल्यामुळे पालिकेचे अधिकारी अडचणीत सापडले आहेत. या आगीच्या चौकशीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून यात काही अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनाही जेलची हवा खावी लागणार आहे.

मुंबईत कोणतेही अनधिकृत बांधकाम पालिका आधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय करूच शकत नाही. कमला मिलमधील सर्वच पब व हॉटेलमधील अनधिकृत बांधकामही अधिकार्‍यांच्या संगनमताने झाल्याचे उघडकीस आले आहे.

तसा आरोप राजकीय पक्षांनीच नाही तर, स्थानिक नागरिकांनीही केला आहे. या आगीची चौकशी पालिका आयुक्त अजोय मेहता करत असून त्यांनी आतापर्यंत वन अबव्ह पबसह अन्य हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाचे साक्षीदार असणार्‍यांची साक्ष नोंदवल्याचे समजते. यावेळी साक्षीदारांनी पालिकेच्या जी-दक्षिण विभागाच्या अधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांचा वन अबव्ह पबच्या अनधिकृत बांधकामाला पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे समजते. या चौकशीत जी-दक्षिण विभागातून बदली झालेले अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फेर्‍यात अडकणार आहेत. आग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 5 अधिकार्‍यांसह सहाय्यक आयुक्त व सुमारे डझनभर अधिकारी अडकण्याची शक्यता आहे. वन अबव्हचे मालक क्रिपेश आणि जिगर संघवी व अभिजीत मानकर यांना अटक झाली. त्यामुळे पालिकेच्या अधिकार्‍यांनाही अहवालानंतर अटक होण्याची शक्यता आहे. अहवाल 2 दिवसांत मुख्यमंत्र्यांना सादर होण्याची शक्यता आहे. 

आम्हाला अटक केली नाही, आम्ही तर शरणागती पत्करली

मुंबई : प्रतिनिधी

कमला मिलमधील ती आग मोजोस बिस्त्रोमध्ये लागली होती. परंतु पोलीस मात्र मोजोस बिस्त्रोच्या मालकांना वाचविण्याचा प्रयत्न करुन आम्हाला अडकवू पाहत होती. त्यामुळे भीतीपोटी आम्ही पळत होतो. पोलिसांनी आम्हाला अटक केली नाही, तर आम्ही शरणागती पत्करली आहे. असा दावा याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केलेल्या क्रिपेश संघवी, जीगर संघवी आणि अभिजीत मानकर या तिन्ही आरोपींच्या वतीने वकिलांनी भोईवाडा न्यायालयात केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना कोठडीसाठी गुरुवारी दुपारी परळमधील भोईवाडा न्यायालयात हजर केले होते.

घटनेच्या रात्री मोजोस बिस्त्रोमध्ये लागलेली ती आग पसरत जाऊन वन अबव्हमध्ये पसरली होती. मात्र मोजोस बिस्त्रोच्या मालकांना  वाचविण्यासाठी पोलिसांनी फक्त आमच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यामध्ये दोषी ठरल्यास 10 वर्षे कारावासाची शिक्षा असल्याने आम्ही प्रचंड घाबरलो होतो. आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून पोलिसांना ही माहिती देत होतो. मात्र पोलिसांनी आम्हालाच टार्गेट केले होते. म्हणून आम्ही लपत होतो. वन अबव्हचे व्यवस्थापक केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनीही आग मोजोस बिस्त्रोमध्ये लागल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलीस आमच्या मागे लागले होते. परंतु अग्निशमन दलाच्या अहवालानंतर पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. मोजोस बिस्त्रोचे मालकच याला जबाबदार असल्यावर शिक्कामोर्तब झाले असून आम्ही पोलिसांपुढे शरणागती पत्करल्याचा दावा संघवी बंधू आणि मानकर यांच्यावतीने न्यायालयात करण्यात आला. आरोपींच्या दाव्यानंतरही न्यायालयाने याप्रकरणी चौकशी आणि तपासासाठी तिन्ही आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांचा दावा...

आग लागल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये जे 14 जण मृत्युमुखी पडले ते वन अबव्हमध्ये होते. तेथील परिस्थितीचा आढावा घेत ग्राहकांच्या मृत्यूस जबाबदार ठरवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग कोठे लागली याला महत्त्व न देता आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना वाचविण्यासाठी वन अबव्हमध्ये कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. तर याठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम आणि अन्य गोष्टींमुळे ग्राहकांचा जीव गेल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर अग्निशमन दलाच्या अहवालानंतर मोजोस बिस्त्रोच्या मालकांचीही नावे यात नोंदवत एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने यावेळी बोलताना स्पष्ट केले.