Wed, Jul 24, 2019 06:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भागीदार भाच्याने घातला बिल्डर मामाला २२ कोटींचा गंडा?

भागीदार भाच्याने घातला बिल्डर मामाला २२ कोटींचा गंडा?

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:12AMमुंबई : अवधूत खराडे

मुलुंडच्या गव्हाणपाड्यातील विकासासाठी मिळालेली मोक्याची जागा परस्पर हडप करुन दोन भाच्यांनी 61 वर्षीय बांधकाम व्यावसायिक मामाला तब्बल 22 कोटी 50 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक चंपालाल वर्धन  यांनी याप्रकरणी दिलेेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी वर्धन यांचा भाचा विनोद गोवानी विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. 

चंपालाल आणि त्यांच्या भागीदारांच्या अ‍ॅकमे कंपनीला 24 एप्रिल 1981 रोजी रघुनाथ पाटील आणि अन्य काही जणांनी त्यांच्या मालकीची मुलूंड पुर्वेकडील निलमनगर गव्हाण पाडा व्हिलेज येथील 77 हजार 823 चौरस मीटर जागा उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये विकसीत करण्यासाठी दिली होती. जागेवर इमारती उभ्या करुन निवासी तसेच व्यापारी गाळ्यांची विक्री, या ठिकाणचे व्यवस्थापन यासाठी चंपालाल आणि उमेद यांना पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देण्यात आली आहे. कंपनी या ठिकाणी 14 इमारती बांधणार असून 2012 पर्यंत याठिकाणी 12 इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संबंधित यंत्रणांकडून परवानग्या घेऊन या इमारतीतील गाळे आणि निवास्थानांची विक्री करण्यात आली आहे. उरलेल्या दोन इमारतीचे बांधकाम सुरू असताना गेल्यावर्षी शासनाचा महारेरा कायदा अस्तित्वात आला. त्यानुसार कागदोपत्री कारवाई पूर्ण करण्यासाठी चंपालाल हे उप निबंधक कार्यालय, कुर्ला येथे गेले होते.

अ‍ॅक्मे इंटरप्राईज कंपनीकडून बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारतींपैकी एका इमारतीची 4 हजार 307.70 चौरस मीटर इतकी जागा मीनु रियल इस्टेट अँड कंपनीच्या नावाने 03 सप्टेंबर 2014 रोजी विक्री केल्याची धक्कादायक माहिती चंपालाल यांना समजली. या कंपनीचा मालक विनोद गोवानी याचा भाऊ हितेश हा असून विनोदने जागेच्या मूळ मालकांकडून सदरची जागा खरेदी अथवा विक्री करण्याकरीता पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी नसतानाही ही जागा हितेशच्या मिनु रियल इस्टेट अ‍ॅन्ड कंपनीसला 22 कोटी 50 लाखांना विकल्याचे उघड झाले.

विनोदने जागा विकल्याचे अ‍ॅक्मे इंटरप्राईज या कंपनीच्या भागीदारांना न सांगता पार्टनशिप डिडनुसार अनधिकृत व्यवहार केल्याचा आरोप चंपालाल यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. कंपनीचा भागिदार असलेल्या विनोदने कंपनीची फसवणूक करून भुखंड विक्रीकरुन मिळालेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता सदर रक्कमेचा अपहार केल्याची तक्रार चंपालाल यांनी दिली. चंपालाल यांच्या तक्रारीवरून आरोपी विनोद गोवानी विरोधात फसवणुकीच्या भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.