Sun, Jul 21, 2019 07:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये सेनेच्या भाईचा तोरा

भांडुपमध्ये सेनेच्या भाईचा तोरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

हत्याकांडांच्या सत्रांनी मराठमोळे भांडुप हादरले असतानाच येथील गुन्हेगारी जगतातून धक्‍कादायक माहिती पुढे येत आहे. येथील सेनेचा भाई हा सेनेच्याच भाऊ आणि दादांपेक्षा मोठा होण्याची स्वप्ने बघत आहे. तोच नव्याने उदयास येत असलेल्या येथील गुंड आणि गुन्हेगारी विचारसरणीच्या पोरांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच पावले उचलली नाही तर गँगवॉर भडकून आणखी काहींच्या विकेट पडण्याची व्यक्त करण्यात येत आहे.  

सोनापूरमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडापाठोपाठ दोन हत्या आणि दोन हत्यांच्या प्रयत्नांनी भांडूपमध्ये गुन्हेगारी टोळ्यांनी डोके वर काढल्याचे पुन्हा उघड झाले. स्थानिक राजकारणी आणि पोलीस यांचे गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे याला कारणीभूत ठरल्याची दबक्या आवाजात सुरू झाली आहे. मुलूंडवासी भाजप नगरसेवकाने भांडूपमधील काही गुंडांना आपल्या हाताशी धरुन आपले वजन वाढविण्यास सुरूवात केल्याने भांडुपमधील सेनेच्या भाई नगरसेवकाने नव्याने उदयास येत असलेल्या येथील गुंड आणि गुन्हेगारी विचारसरणीच्या पोरांना पाठीशी घालत, त्यांना राजकीय वजन वापरुन गुन्ह्यातून सोडविणे, पोलीस कारवाईपासून वाचविण्यास सुरूवात केली आहे.

भांडुपमधील गँगस्टर्सना हाताशी धरुन आपला कारभार चालविणार्‍या येथील भाऊ आमदारापासून आणि राजकारण करताना गुन्हेगारांनाही आपल्या सोबत घेऊन चालावे लागते, असे भाषण शाळेतील मुलांसमोर करणार्‍या दादा आमदारांपेक्षा आपल्याला मोठे व्हायच आहे, अशी स्वप्ने हा भाई नगरसेवक बघत असल्याने राजकीय वातावरणही येत्या काळात तापण्याची दाट शक्यता आहे. त्यातच भांडूपचे आमदार अशोक पाटील यांनीही विधानसभेमध्ये गुन्हेगारांनी आपल्याला तीन वेळा धमकावल्याची व्यथा मांडल्याने येथील गुंडांना असलेल्या राजकीय वरदहस्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

संतोष चव्हाण आणि अनिल पांडे यांचे पूर्वनियोजित कटातून काटे काढल्यानंतर अमित भोगले व मयुर शिंदे यांचे या विभागावर वर्चस्व आहे. दोघांवरही आमदार आणि मंत्र्यांचे वरदहस्त आहेत. या दोघांपासून वेगळ्या होऊन स्वतंत्र टोळ्या तयार करत गुन्हेगारीत जगतात पाय रोवू पाहणार्‍यांना नगरसेवक पदावरील राजकीय प्रतिनिधींनी जवळ केले आहे.  
शिंदेला पोलिसांनी शहरातून तडीपार केले असून ठाण्यामध्ये राहात असलेला भोगले विभागात येऊन-जाऊन असतो. वॉन्टेड आरोपी सागर जाधव, योगेश रोकडे याच्यासह विजय बाबर उर्फ विज्या, आदीत्य शिरसागर उर्फ शिर्‍या, मिलिंद कांदे उर्फ कांद्या, राकेश राऊत, सिद्धेश तावडे उर्फ ताऊ, राहूल माधव उर्फ मुन्ना, आशीष घोडगे उर्फ आशा, हितेश जाधव उर्फ हड्डी यांच्यावर वचक ठेवण्याचे आव्हान भांडुप पोलीस आणि गुन्हे शाखेसमोर आहे. 

पांडे हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार?

मुलूंडमधील एका बांधकाम साईटचे मोठे काम अनिल पांडे याला मिळाले होते. त्यामुळे मयुर शिंदे संतापला होता. शिंदे याने साईटवर जाऊन काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र पांडे तेथे उपस्थित असल्याने त्याची डाळ शिजली नाही. पांडेने त्याला पळवून मारत हाकलवून लावले. याच रागातून थंड डोक्याने कट रचून पांडेचा काटा काढण्यात आला. आता मुलूंडमधील एका बांधकामसाईटच्या कामावरुन शिंदेला अमित भोगले भिडला आहे.

भोगले, साथीदारांना पोलिसांचा चोप

वर्चस्वाच्या लढाईतून हत्याकांडे घडल्याचा इतिहास ताजा असतानाच मयुर शिंदे याला मुलुंडमधील एका बांधकामाधीन इमारतीचे काम मिळाले आहे. प्रतिस्पर्धी गँगस्टरला काम मिळाल्याने संतापलेला अमित भोगले 50 ते 60 पोरांना घेऊन सोमवारी सकाळी काम बंद पाडण्यासाठी या साईटवर पोहचला. शहरातून तडीपार असल्याने शिंदे साईटवर नव्हता.

सोबत आणलेल्या पोरांच्या मदतीने येथील कामगारांना धमकावत काम बंद पाडण्याचा प्रयत्न भोगले याने केला. घटनेची माहिती मिळताच मुलूंड पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. साईटमध्ये घसून दरवाजा बंद करत भोगलेसह त्याच्या साथिदारांना चोपण्यास सुरूवात केली. मिळेल त्या वाटेने भोगलेसोबत असलेली पोरं पळून गेली. अखेर पोलिसांनी भोगलेसह काही जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून चोपण्यास सुरूवात केली. आणि होणार होते तेच झाले, बड्या राजकारण्यांचे फोन पोलीस ठाण्यात आले व कोणतीही कारवाई न करता पोलिसांना भोगलेसह त्याच्या साथीदारांना सोडावे लागल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून हाती लागली आहे.


  •