Tue, Jul 16, 2019 22:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गंभीर गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण चिंताजनक

गंभीर गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण चिंताजनक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईमध्ये दाखल होणार्‍या गंभीर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना गंभीर गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र चिंताजनक असल्याची धक्कादायक माहीती प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेल्या वार्षीक अहवालातून समोर आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेत मंगळवारी प्रजा फाऊंडेशनने हा अहवाल प्रसिद्ध केला.

मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 1 हजार 326 प्रकरणांचा अभ्यास केला असता 911 प्रकरणांमध्ये संशयितांवर आरोप सिद्ध होऊ शकले नाही. तर आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या 33 खटल्यांतील साक्षिदारच फिरल्याचे उघड झाले आहे. 

10 जणांनी खटलेच मागे घेतले असून यातील बलात्काराच्या 300 खटल्यातील अवघ्या 54 खटल्यांमध्ये, तर हत्येच्या 244 खटल्यांपैकी अवघ्या 60 खटल्यांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांतील दोषसीद्धीचे प्रमाण 2016 मध्ये 19 टक्के होते.

पोलिसांकडून होणारा गुन्ह्याचा तपास, आरोपपत्र दाखल करण्यात होणारी दिरंगाई, खटला दाखल करुन घेत तो सुनावणीला घेण्यासाठी लागणारा महिन्यांचा कालावधी, सरकारी वकिलांची अनास्था, खटला चालविण्याची निकृष्ट पद्धत यामूळे गुन्ह्यांतील दोषसिद्धीचे प्रमाण घटल्याचे प्रजा संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाल्याचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अनेक गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये आरोपींना कमी शिक्षा होत असून बलात्काराच्या गुन्ह्यांचा न्यायालयनिवाडा होण्यासाठी 21.3 महिन्यांचा कालावधी जातो. तर हत्येचे खटले 24.7 महिने चालतात. तर एखाद्या गुन्ह्याची पोलिसांकडे नोंद झाल्यानंतर तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरासरी तब्बल 11.6 महिन्यांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे.

गुन्ह्यांची आणि दाखल होणार्‍या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यातुलनेत न्यायालयांची कमतरता भासत आहे. शासनाकडून 63 पदे मंजूर असताना सद्यस्थितीला अवघे 38 कायमस्वरुपी सरकारी वकील कार्यरत आहेत. तर कंत्राटपद्धतीवर 40 पदे मंजूर असताना 31 पदेच भरण्यात आली असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्‍वस्त निताई मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात गुन्ह्यांमध्ये मोठी घट- मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

गृह विभागाच्या व्यापक उपाय योजनांमुळे राज्यात बहुतांश गुन्ह्यात घट झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यस्था संपूर्ण नियंत्रणात आहे, असा दावा करीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावला. 

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची बाब खरी नाही.  गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात 21 टक्क्यांनी, दरोड्याच्या गुन्ह्यात 26 टक्क्यांनी, रिव्हॉल्वरसह टाकण्यात आलेल्या दरोडयात 9.5 टक्क्यांनी, जबरी चोरीत 31 टक्क्यांनी, अग्निशस्त्रासह जबरी चोरी 29 टक्क्यांनी, घरफोडीत 29 टक्क्यांनी, दंगे 1.52 टक्के तर जातीय दंग्यात 37.37 टक्क्यांनी घट झाली

रेल्वे विभागात चोरी गेलेले किंवा गहाळ झालेल्या मोबाईल व इतर वस्तूंची गहाळ म्हणून नोंद घेतली जात होती. परंतु, आता ही नोंद गहाळ म्हणून न घेता चोरी या स्वरुपात घेण्यात येत असल्याने राज्यात चोरीच्या गुन्ह्यात वाढ दिसत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

बलात्काराच्या व्याख्येची व्याप्ती वाढविल्यामुळे बहुतांश गुन्ह्यांची नोंद होत असल्याने दोष सिद्धी होऊन शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये देशामध्ये महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर असून बलात्काराच्या गुन्ह्यात 15 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या गुन्ह्यात महाराष्ट्र वरच्या क्रमांकावर आहे हा देखील गैरसमज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नितीन आगे हत्या प्रकरणात आरोपी सुटल्यामुळे या निकालाच्या विरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात अपील दाखल केले आहे. तसेच नितीन आगेच्या कुटुंबियांनी मागणी केल्याप्रमाणे या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी उमेशचंद्र यादव पाटील आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अश्वीन थूल यांची नेमणूक केलेली आहे. या प्रकरणातील फितूर साक्षीदारांवर अहमदनगर जिल्हा न्यायालयात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे निर्घृण खून प्रकरणाचा तपास योग्यरित्या सुरू असून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करेल. 

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेवर मांत्रिकाच्या माध्यमातून मंत्रोपचार केल्याप्रकरणातील मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या डॉक्टरलाही लवकरात लवकर अटक करुन जादुटोणा प्रतिबंधात्मक कायद्याद्वारे कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


  •