Wed, Nov 21, 2018 13:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकऱ्याच्या हत्येचा उलगडा, भावानेच केली होती हत्या

शेतकऱ्याच्या हत्येचा उलगडा, भावानेच केली होती हत्या

Published On: Mar 14 2018 2:45PM | Last Updated: Mar 14 2018 2:45PMडोंबिवली : वार्ताहर

दारूसाठी सतत पैशांची मागणी आणि दारूच्या नशेत शिवीगाळ करण्याच्या रागातून चुलत भावाने एका साथीदाराच्या मदतीने आपल्या भावाची हत्या केल्याची घटना कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ज्ञानेश्वर कोट असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी चुलत भावासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.  

कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहोने गावात राहणारा शेतकरी ज्ञानेश्वर कोट हा तरुण 13 फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. ज्ञानेश्वर हा बेपत्ता झालेल्या दिवशीच त्याचा चुलत भाऊ मोतीराम कोट आणि पडघा येथे राहणाऱ्या निखील जाधव या दोघांच्यासोबत दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  संशयावरून पोलिसांनी मोतीराम याला ताब्यात घेतले. त्यानंतर निखील जाधव यालाही उचलले.

पोलिस चौकशीत दोघांनी हत्येची कबूली दिली. मोतीरामकडे ज्ञानेश्वर हा दारू पिण्यासाठी नेहमी पैसे मागत असे आणि दारू प्यायल्यानंतर तो मोतीरामलाच शिवीगाळ करत असे. या प्रकाराला वैतागलेल्या मोतीरामने हा राग मनात धरून निखिलच्या मदतीने ज्ञानेश्वरची हत्या केली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेला सुरा आणि कोयता देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.