Tue, Jul 16, 2019 22:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्रिकेट बुकी कारिया गजाआड

क्रिकेट बुकी कारिया गजाआड

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:36AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी क्रिकेट बुकी विशाल कारिया याला मंगळवारी रात्री गजाआड केले. कारिया याच्या घराबाहेर वन अबव्हचा मालक आणि गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी अभिजित मानकर याची गाडी सापडल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करत ही कारवाई केली आहे. 

वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून आणि गुदमरून 14 जणांचा मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. याप्रकरणी वन अबव्हचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर यांच्यासह येथील व्यवस्थापक, संचालक व अन्य जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत ना. म. जोशी मार्ग पोलीस तपास करत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांनी वन अबव्हच्या केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज या दोन व्यवस्थापकांना अटकसुद्धा केली. मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी संघवी बंधू आणि मानकर यांचा थांगपत्ता पोलिसांना मिळाला नाही.

माझगाव परिसरात राहात असलेल्या काका महेंद्रकुमार संघवी, राकेश संघवी आणि आदित्य संघवी यांनी गुन्ह्यातील आरोपी संघवी बंधूना पळून जाण्यात मदत केल्याचे उघड होताच, तिन्ही आरोपींविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या. तर यातील काही आरोपी हे क्रिकेट बुकी कारिया याच्यासोबत संपर्कात असून त्यांच्या गाड्या कारियाच्या घराबाहेर असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कारियाला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली. आरोपींना पळून जाण्यात कारियाचा सहभाग समोर आल्यानंतर त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या घराबाहेरून आरोपी मानकर याची गाडी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. कारिया हा क्रिकेट बुकी असून त्याचे क्रिकेट जगतातील मोठे खेळाडू, पदाधिकारी, राजकारणी, बॉलीवूड सेलिब्रिटी, उच्चपदस्थ सनदी आणि पोलीस अधिकार्‍यांशी जवळचे संबंध आहेत.

गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वन अबव्हचे व्यवस्थापक बावा आणि लोपेज यांची न्यायालयाने 22 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोलीस तपासादरम्यान या दोघांंनीही  त्या रात्री लागलेली आग मोजोस बिस्त्रोमध्ये लागल्याचा दावा केला.