Mon, May 20, 2019 22:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पतसंस्था गैरकारभाराला चाप

पतसंस्था गैरकारभाराला चाप

Published On: Dec 11 2017 1:55AM | Last Updated: Dec 11 2017 1:43AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

संचालक मंडळाचा गैरकारभार, कोणतेही तारण न घेता झालेले कर्जवाटप अशा विविध कारणांमुळे राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सहकारी पतसंस्था डबघाईस आल्या आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या पतसंस्थांचा कामात गुणात्मक सुधारणा करण्याबरोबरच संस्थाचालकांच्या गैरकारभाराला चाप लावण्यासाठी सहकारी पतंस्थांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. 

राज्यात सुमारे 2 लाख सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थांची सभासद संख्या सुमारे साडेपाच कोटींच्यावर आहे. या क्षेत्रात जवळपास 6 लाख कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. मात्र काही सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाने कायदे व नियमांचे उल्लंघन करून घेतलेल्या निर्णयांमुळे नागरी व ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था आर्थिक अडचणीत आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत राज्यातील काही प्रमुख सहकारी संस्थांच्या कारभाराचा सखोल अभ्यास करून गुणात्मक सुधारणा करण्यासाठी उपायोजना सुचविण्यासाठी अपर निबंधकांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे.

उद्देशाची पूर्तता किती

सहकार कायद्यानुसार संस्था स्थापना करण्याचा उद्देश आणि त्याची पूर्तता संबंधितांकडून आतापर्यंत किती झाली हे पतसंस्थांच्या कामाचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने तपासून पाहण्यात यावे. त्याचबरोबर संस्थांना दिलेले शासकीय अर्थसहाय्य, त्याचा विनियोग व आतापर्यंत झालेली वसुली. सभासदांच्या आर्थिक उन्नतीत संस्थेचे योगदान, रोजगार निर्मिती, संस्थेच्या कामकाजातील त्रुटी, अनियमितता व गैरव्यवहार यासंदर्भात करण्यात आलेली कारवाई आदी मुद्दे विचारात घेण्यात यावे, अशा सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत.