Sat, Sep 22, 2018 14:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डहाणू पॅटर्न : वारली बोलीभाषेतून प्रमाण मराठी भाषेकडे

डहाणू पॅटर्न : वारली बोलीभाषेतून प्रमाण मराठी भाषेकडे

Published On: Mar 07 2018 2:08AM | Last Updated: Mar 07 2018 1:40AMडहाणू : चंद्रकांत खुताडे

आदिवासी मुलानां शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना प्रमाणभाषेची आवड निर्माण करण्यासाठी वारली बोलीभाषेत साहित्याची निर्मिती करण्याचा आगळा प्रयोग जि.प. शाळा खोरीचा पाडा येथील प्राथमिक शिक्षक राजन गौतम गरूड यांनी यशस्वी केला असून वारली बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे घेऊन जाणारा हा प्रवास महाराष्ट्रातील इतरही अनेक बोलीभाषांना मुख्य प्रवाहाशी जोडणारा ठरू शकेल.

जिथे मायबोली मराठी सोडून इंग्रजीचा सोस वाढतोय त्याच महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या पालघरच्या आदिवासी पाड्यांवर मुले आधी बोलीभाषेत किंवा त्यांच्या मायबोलीत म्हणजे वारलीत शिकतात आणि मग प्रमाण मराठी भाषा अभ्यासतात. त्यासाठी गरूड गुरुजींनी वारली शिकण्यापासून प्रमाण भाषेतील पुस्तके वारलीमध्ये अनुवादीत करण्यापर्यंत कष्ट घेतले. 

इयत्ता पाहिलीच्या  विद्यार्थ्यांना वारलीतच अध्ययन करता यावे, म्हणून गोष्टी, चित्रकथा, संवाद, गाणी मराठीतून वारलीत आणली. या मुलांच्या रोजच्या जगण्यात जे शब्द वापरले जातात त्यांचा संग्रह करून त्यातून वारली- मराठी  शब्दसंग्रह आकारास आला. वारली वर्णमालाही तयार करण्यात आली. वारली बोलीभाषेत पहिलीच्या बालभरतीच्या पुस्तकाचा अनुवाद करण्यात आला. हे सर्व साहित्य ब्लॉग,यू ट्यूब, पीडीएफच्या माध्यमातून पालघर,ठाणे, नाशिक जिल्ह्यातील वारली पाड्यावर काम करणार्‍या शिक्षकांसाठीही उपलब्ध करून देण्यात आले.