Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रुळाला तडा; मरे विस्कळीत

रुळाला तडा; मरे विस्कळीत

Published On: Jan 31 2018 2:05AM | Last Updated: Jan 31 2018 1:33AMआसनगाव : पुढारी वार्ताहर

मध्य रेल्वेच्या आटगाव-आसनगाव स्थानकादरम्यान अप मार्गावर मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेल्याने कसार्‍याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार आटगाव-आसनगावदरम्यान पोल क्रमांक 92/41 या ठिकाणी रुळाला तडा गेल्याचे भुसावळ-पुणे या एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या लक्षात आले. त्या मोटरमनने नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती देताच रेल्वेच्या नियंत्रण कक्षातून आटगाव स्थानकावर सूचना देण्यात आली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस आटगाव स्थानकात थांबवण्यात आली. यामुळे कसार्‍याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. हा प्रकार ऐन सकाळी झाल्याने मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे नोकरीनिमित्त जाणार्‍या चाकरमान्यांचे पुन्हा एकदा हाल झाले. रेल्वे कामगारांनी तात्काळ रुळाची दुरुस्ती केल्यानंतर साधारण तासाभराने वाहतूक पुन्हा सुरू झाली.