Sat, Aug 24, 2019 19:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर, भिवंडीत मतमोजणीच्या सर्वाधिक  ३५ फेर्‍या होणार

पालघर, भिवंडीत मतमोजणीच्या सर्वाधिक  ३५ फेर्‍या होणार

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 1:16AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार 23 मे रोजी होणार असून राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 35 निवडणूक निकाल फेर्‍या होतील. पालघर आणि भिवंडी - गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण 33 निवडणूक निकाल फेर्‍या तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण 32 निवडणूक निकाल फेर्‍या होतील. सर्वात कमी म्हणजे 17 निवडणूक निकाल फेर्‍या हातकणंगले मतदारसंघात होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात 18 निवडणूक फेर्‍या होतील.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 867 उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरात 97 हजार 640 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार असून मतमोजणी कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

अशी होणार मतमोजणी

लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून उपनगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चार लोकसभा मतदारसंघांसाठी सुमारे 4 हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. 

26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्‍चिम व 29- मुंबई उत्तर मध्य या 3 लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी गोरेगाव पूर्वेतील नेस्को (बॉम्बे एक्झिबिशन सेंटर) या मतमोजणी केंद्रावर तर 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळी पूर्वेतील उद्यांचल प्राथमिक शाळा या केंद्रावर सकाळी 8 पासून केली जाणार आहे. 

26- उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय होणार्‍या मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत.  बोरिवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली, चारकोप, मालाड (पश्‍चिम) या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.  विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीच्या किमान 18 तर कमाल 23 फेर्‍या होणार आहेत.