Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नगरसेवकांचे मानधन वाढणार!

नगरसेवकांचे मानधन वाढणार!

Published On: Feb 18 2018 2:00AM | Last Updated: Feb 18 2018 1:34AMमुंबई : प्रतिनिधी 

आमदार व खासदारांचे ज्यावेळी मानधन वाढेल, त्यावेळी नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली आहे. याबाबत पालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्य सरकारच्या मंजूरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे नगरसेवकांच्या मानधनात वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात अलिकडेच 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये वाढ करण्यात आली. पण 25 हजार रुपयेही त्यांना कमी पडू लागल्यामुळे आता आमदार-खासदारांच्या मानधनावर बोट ठेवत नगरसेवकांनी मानधन वाढवून देण्याची मागणी लावून धरली आहे. खासदार व आमदारांच्या मानधन वाढीवरून सध्या देशवासियांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशात मुंबईच्या नगरसेवकांनीही मानधनात वाढ करण्याची मागणी केल्यामुळे मुंबईकरांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. नगरसेवक पदी विराजमान झाल्यानंतर वर्षभरात लखपती होणार्‍या नगरसेवकांना मानधनाची काय गरज, असा सवाल मुंबईकरांनी केला आहे. 

शुक्रवारी पालिका सभागृहात नगरसेवकांना सध्या 25 हजार रुपये इतके तुटपुंज मानधन देण्यात येत असून हे आमदारांच्या तुलनेत कमी आहे. सध्याच्या महागाईच्या तुलनेत हे मानधन खुपच कमी असल्याचे मत समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख व्यक्त केले. दरम्यान राज्य सरकार आमदारांच्या मानधनात ज्या वेळी वाढ करेल, त्यावेळी मुंबईतील नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी ठरावाची सूचना शेख यांनी महापालिका सभागृहाच्या मंजूरीसाठी सादर केली. याला शिवसेनेसह काँग्रेस व भाजपानेही पाठिंबा दिला. अखेर या ठरावाला सभागृहात एकमताने मंजूरी देण्यात आली. त्यामुळे हा ठराव राज्य सरकारच्या मंजूरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले. 

अलिकडेच नगरसेवकांना मानधन वाढवण्यात आल्यामुळे यात अजून वाढ करणे शक्य नसल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. 

सध्या नगरसेवकांना 25 हजार मानधनासोबत मोबाईल बिल, महापालिका सभागृहाचे मानधन देण्यात येते. तर समिती अध्यक्षांना चहासाठीही निधीची तरतूद असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.