Mon, Apr 22, 2019 03:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदारकीची स्वप्ने पाहणारा नगरसेवक भाईच्या बॅनरवर

आमदारकीची स्वप्ने पाहणारा नगरसेवक भाईच्या बॅनरवर

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:07AMमुंबई : अवधूत खराडे

गेल्या महिन्यातील तिहेरी हत्याकांडासह पाच हत्यांनी हादरलेल्या भांडुपमध्ये आजही राजकीय व्यक्तींच्या वरदहस्ताखाली गुंडांचे राज्य असल्याचा आणखी पुरावा समोर आला आहे. यावेळी निमित्त ठरले आहे ते, कुमार पिल्लई टोळीचा गँगस्टर मयुर शिंदे याच्यापासून वेगळ्या झालेल्या सागर जाधव याच्या वाढदिवसाचे. मुलुंडवासी आणि भांडुपमधून आमदार होण्याची स्वप्ने बघत असलेल्या या नगरसेवकाचा फोटो सागरभाईच्या वाढदिवसासाठी लावलेल्या बॅनरवर झळकत आहे. 

भांडूपसह आजूबाजूच्या परिसरात वर्चस्व गाजवत असलेल्या कुमार पिल्लई टोळीतील गँगस्टर अमित भोगले आणि शिंदे याच्यापासून वेगळ्या झालेल्या शूर्टसनी आपल्या स्वतंत्र टोळ्या तयार केल्याचे पोलिसांसह सर्वश्रुत आहे. भोगले आणि शिंदे हे दोघेही बड्या आमदार, मंत्र्यांच्या वरदहस्ताखाली असल्याने नव्याने तयार होत असलेल्या या शूटर्सन ा आमदारकीची स्वप्ने बघत असलेल्या सेना-भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या आश्रयाला ठेवले आहे. राजकीय वरदहस्त आणि त्यांच्याकडून मिळत असलेली मलई त्यामुळे पोलिसही त्यांच्या गुन्हेगारी कारवायांकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक सामान्य नागरिक मात्र मोठ्या संकटात सापडले आहेत.

ज्यांचा हात धरून गुन्हेगारी कारवायात उतरले, ते शूटर्स आता याच गँगस्टर्सना खुली आव्हाने देत आहे. भाजपच्या नगरसेवकाच्या आश्रयाखाली राहून सागरभाई आणि भोगलेपासून वेगळ्या झालेल्या आदित्य शिरसागर उर्फ शिर्‍या याने याच जोरावर या टोळीने भोगलेला संपविण्याचा काही महिन्यांपूर्वी कट रचला होता, अशी माहिती मिळते. त्यानंतर नगरसेवकाच्या मदतीने त्यांना मुलूंडमधील एका बांधकाम साईटवर खड्डा खणण्याचे काम मिळाले. हेच काम भोगलेला मिळणार होते. त्यामुळे संतापलेल्या भोगलेने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 50 ते 60 पोरांना घेऊन साईटवर एन्ट्री मारली.

भोगलेच्या एन्ट्रीमुळे सागरभाई आणि शिर्‍याची गोची झाली. अखेर भोगलेला ताब्यात घेत कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या मुलूंड पोलिसांनाही राष्ट्रवादीच्या ठाण्यातील एका बड्या आमदाराचा फोन आल्याने त्याला सोडून द्यावे लागल्याचे सूत्रांकडून समजते. त्यानंतर मात्र मुलूंडमधील याच नगरसेवकाने भोगलेसोबत गुप्तठिकाणी बैठक घेऊन मध्यस्थी केल्याची माहिती मिळते. गेल्या काही वर्षांपासून हा नगरसेवक पडद्याआड राहून शूटर्सची मदत करत होता, तो आता सागरभाईच्या बॅनरवर झळकू लागल्याने दहशतीखाली असलेल्या भांडूपकरांमध्ये राजकीय वरदहस्ताखाली असलेल्या भाईंच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 

Tags : mumbai, mumbai news, Councilor photo, Sagarbhai, Birthday Banner,