Mon, May 20, 2019 22:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नगरसेवकांना पुन्हा हवीय मानधनवाढ

नगरसेवकांना पुन्हा हवीय मानधनवाढ

Published On: Feb 14 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मानधनात अलीकडेच 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये वाढ करण्यात आली. पण 25 हजार रुपयेही त्यांना कमी पडू लागल्यामुळे आता आमदार-खासदारांच्या मानधनावर बोट ठेवत नगरसेवकांनी मानधन वाढवून देण्याची मागणी लावून धरली आहे. एवढेच नाही तर, या बाबतचा ठराव संमत करून तो राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. 

खासदार व आमदारांच्या मानधन वाढीवरून सध्या देशवासीयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशात मुंबईच्या नगरसेवकांनीही मानधनात वाढ करावी, असा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. आमदारांना राज्य शासनामार्फत मानधन, निवृत्ती वेतन, राहण्यास घर, गाडी प्रवास भत्ता, विमान प्रवास, दूरध्वनी भत्ता आदी सुविधा दिल्या जातात. तर महागाईच्या प्रमाणात त्यांच्या मानधनात वेळोवेळी वाढ करण्यात येते. मतदारांच्या मूलभूत सेवा-सुविधा संबंधातील समस्या सोडवण्याचे काम प्रामुख्याने लोकप्रतिनिधी करत असतात. जनतेला स्थानिक पातळीवर सेवा-सुविधा पुरवणे व त्यांच्या नागरी समस्या दूर करण्याचे काम नगरसेवक करत असतो. नगरसेवकांना नागरिकांच्या कामानिमित्त ठिकठिकाणी प्रवास करावा लागतो. अतिवृष्टी, झाड पडणे, आग लागणे अशा अनेक दुर्घटना घडल्यास नगरसेवकांना त्यांच्या मदतीसाठी तातडीने जावे लागते. यासाठी दूरध्वनी, प्रवास व पत्रव्यवहाराकरिता बराच पैसा खर्च होतो, असे मत समाजवादी पार्टीचे गटनेते नगरसेवक रईस शेख यांनी व्यक्त केले.