Thu, Feb 21, 2019 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जे.जे.मध्ये सुरु होतोय कॉस्मेटिक विभाग!

जे.जे.मध्ये सुरु होतोय कॉस्मेटिक विभाग!

Published On: Mar 06 2018 1:49AM | Last Updated: Mar 06 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

आजकाल तरुण मुले-मुली असोत किंवा मध्यमवर्गीय नोकरदार महिला सर्वजण सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक शस्त्रक्रियेकडे वळू लागले आहेत. शारीरिक व्यंग, अपघात यामुळे निर्माण झालेले दोष वा सौंदर्यविषयक विशिष्ट ठेवणीसाठी केले जाणारे हे उपचार महागडे असल्याने गरीब वा मध्यमवर्गीयांना परवडत नाहीत. मात्र सर्वसामान्यांना मोफत सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केंद्र जे. जे. रुग्णालयात पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. 

जे. जे. रुग्णालय समूहांकडे देशाच्या कानाकोपर्‍यातून वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी रुग्ण येत असतात. अपघात, शारीरिक दोष, व्यंगामुळे लहान वयात आलेल्या विकृती आदींवर प्लास्टिक सर्जरी वा कॉस्मेटिक सर्जरीद्वारे उपचार शक्य असतात. मात्र हे महागडे उपचार या रुग्णांना परवडत नाहीत. जे. जे. रुग्णालयात अनेक वर्षांपासून कॉस्मेटिक शस्त्रक्रिया विभाग कार्यरत असून सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेणार्‍यांची संख्या मागील काही वर्षात वाढू लागली आहे. फक्त महिलाच नाही तर पुरुषही या शस्त्रक्रिया करवून घेताना दिसतात. यासाठी आता जे. जे. रुग्णालयात कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करून घेण्याची इच्छा असणार्‍या रुग्णांसाठी खास स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग पुढील आठवड्यात रुग्णांच्या सेवेत दाखल होईल.

कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे केवळ सुंदर दिसण्यासाठी केल्या जाणार्‍या शस्त्रक्रिया नाहीत, तर सुंदर दिसण्यासह योग्य वैद्यकीय कारणांसाठी या शस्त्रक्रियांची मोलाची मदत होऊ शकते, असा हे केंद्र सुरू करण्यामागील उद्देश आहे. अनेकदा बाळंतपणानंतर स्त्रियांचे वजन, स्तनांचा आकार वाढून त्यामुळे असह्य पाठदुखी सुरू होते. त्यासाठी स्तनांचा आकार कमी करण्याची शस्त्रक्रिया करता येते. मात्र अनेक महिला यावरील उपचारांसाठी हाडांच्या डॉक्टरांकडे जातात. त्यातून ही दुखणी बळावतात. काहींना पोटाच्या घेरामुळे श्वसनमार्गावर दाब येतो, चालतानाही दमछाक होते. ओपीडीमध्ये असे शेकडो रुग्ण दिसतात. या रुग्णांना कॉस्मेटिक विभागाचा मोठा फायदा होईल, असे प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत घरवडे यांनी सांगितले. 

ओठ-टाळू दुभंग शस्त्रक्रिया जीटीमध्ये जे.जे. मधील या केंद्रासह जीटी रुग्णालयात ओठ वा टाळू दुभंगलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियांसाठी एक विशेष केंद्राची लवकरच सुरुवात केली जाणार आहे.