कमी तापमानाच्या प्रदेशातच कोरोना विषाणूचा फैलाव

Last Updated: Mar 29 2020 10:56PM
Responsive image


मुंबई : वृत्तसंस्था

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर अमेरिकेतील जॉन्स हापकिन विद्यापीठात नुकतेच संशोधन झाले आहे. या संशोधनातील निष्कर्षानुसार  जेथे कमी तापमान असेल तेथेच कोरोनाने सर्वाधिक उच्छाद मांडला आहे. अगदी आकड्यात सांगायचे, तर तीन ते तेरा अंश डिग्री सेल्सिअस तापमान जेथे आहे त्या ठिकाणी कोरोना सर्वाधिक पसरला आहे. जॉन्स हापकिन विद्यापीठ हे जगभरात ख्यातीप्राप्त आहे. त्यामुळे त्यांचे निष्कर्ष विश्वासार्ह मानले जातात. भारतातील बहुतेक सगळ्या भागांत उन्हाळ्याचे चटके बसायला सुरुवात झाली असल्याने ही एक अत्यंत दिलासादायक अशीच बातमी म्हणावी लागेल.

अमेरिकेला बलाढ्य बनविण्यात ज्यांचा हातभार लागला आहे. त्यात जॉन्स हापकिन यांचे नाव अगदी वरच्या स्थानावर आहे. अमेरिकेत रेल्वेचे जाळे उभारण्यात त्यांचा वाटा फार मोठा होता. त्याच्याच आधारे त्यांनी अमेरिकेला व्यापारातही अग्रस्थानी नेऊन ठेवले. अशा या जॉन्स हाफकिन यांच्या नावानेच अमेरिकेत विद्यापीठ उभारण्यात आले आहे. संशोधनासाठी वाहिलेले हे विद्यापीठ आहे. निरनिराळ्या विषयांवर तेथे संशोधने चालतात. कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या विषाणूवरही संशोधन केले. त्यात जेथे तापमान कमी तेथे कोरोनाच्या विषाणूंनी हात-पाय पसरायला सुरुवात केल्याचे विद्यापीठाने आपल्या प्रबंधात म्हटले आहे. कोरोनाची सुरुवात जेथे झाली त्या चीनमधील वुहान शहरातील तापमानही 18 अंश सेल्सिअसच्या वर आहे. उष्ण हवामानाचा हा प्रदेश आहे. वुहानमध्ये कोरोनाची लागण झाली. मात्र, तापमान जास्त असल्याने सुरुवातीला ती फारशी वेगाने पसरली नाही. तिची गती संथ होती. दुर्दैवाने याचवेळी वुहानमधील तापमानात प्रचंड घसरण झाली आणि ही संधी शोधून कोरोना विषाणूंनी तेथे हात-पाय पसरले. त्यानंतर वुहानची जी काही अवस्था झाली ती संपूर्ण जगाने पाहिली आहे.

हाँगकाँग आणि सिंगापूरचे सरासरी तापमान 20 अंशांच्या वर आहे. त्यामुळेच तेथे कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव जाणवला नाही. कोरोना विषाणूचा प्रसार तापमानाशी कसा निगडित आहे हे पटवून देण्यासाठी प्रबंधात काही नकाशे आणि अन्य माहिती दिली आहे. सर्वात कमी तापमान आणि सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांची उदाहरणेही त्यात आहेत.

हापकिन विद्यापीठाने यापूर्वी सार्स या आजारावरही संशोधन केले होते. सार्स हा कोरोना विषाणूच्या जातीतलाच. फुफ्फुसावर हल्ला करणे हे दोघांचेही काम. खोकला आणि शिंक यातूनच या दोघांचा प्रसार होतो. 2003 मध्ये जगभरातील पाच खंडांतील 30 देशांमध्ये सार्सने प्रचंड धुमाकूळ घातला होता. त्यावेळीही जे संशोधन झाले त्यातही कमी तापमानाच्या ठिकाणी सार्सने जास्ती हात-पाय पसरल्याचे समोर आले होते. सार्सचे काही विषाणू कमी तापमानात, तर काही जास्त तापमानात ठेवण्यात आले. त्यात कमी तापमानाच्या ठिकाणचे विषाणू धष्टपुष्ट बनल्याचे निदर्शनास आले. हाच प्रकार कोरोनाबाबत असल्याचा हाफकिनच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे.
 articleId: "185543", img: "Article image URL", tags: "Corona, virus, infection, Haffkine University, USA, pudhari news, pudhari onlline",