Mon, Jun 01, 2020 04:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या दवाखान्यांतही शिरला कोरोना विषाणू!

मुंबईच्या दवाखान्यांतही शिरला कोरोना विषाणू!

Last Updated: Apr 01 2020 1:03AM
मुंबई : दिलीप सपाटे/तन्मय शिंदे

उपचार करणारे डॉक्टरच कोरोना बाधित झाल्याने सैफी हॉस्पिटल सील करावे लागले असताना मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात देखील एका कोरोनाबाधित पेशंटचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जसलोक रुग्णालयातही कोरोना शिरला असून, कोरोनाबाधित रुग्णामुळे एका नर्सला बाधा झाली आणि बाधित रुग्ण व बाधित नर्सच्या संपर्कात आलेल्या नर्स, डॉक्टर व कर्मचार्‍यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून, ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्येही कोरोनाबाधित रुग्णावर उपचार झाल्याने डॉक्टरसह तीस जणांना क्वारंटाईन करावे लागले आहे. 

मृत्यूनंतर चाचणीत पेशंट कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आल्याने केईएम प्रशासनाची झोप उडाली आहे. 28 तारखेला कांदिवली येथील एका 35 वर्षीय महिलेला वॉर्ड क्रमांक 20 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिच्यावर केईएमच्या डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे उपचार केले. मात्र, त्या महिलेचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्यानंतर संशय आल्याने या महिलेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता रुग्णालय प्रशासनाची झोपच उडाली. ही महिला कोरोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडल्याचे समोर आले. त्यानंतर रुग्णालयाचे सहा डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला क्वारंटाईन करण्यात आले. कांदिवलीत राहणार्‍या सदर महिलेचे कुटुंबीय आणि सहवासात आलेल्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेने रुग्णालयातही भीतीचे वातावरण पसरले आहे. 
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून माहिती लपविण्यात आल्याने आणि रुग्णालयांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने आरोग्य यंत्रणेला कोरोनाचा धोका वाढला आहे. 

ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तीवर  उपचार करण्यात आले होते. त्याला घरी सोडल्यानंतर श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याची तपासणी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. या माहितीनंतर ठाणे महापालिका प्रदर्शन सतर्क झाले आहे. या  रुग्णालयातील डॉक्टर आणि आणि कर्मचारी मिळून 35 जणांना  क्वारंटाईन करण्यात आले आहे. हे रुग्णालयच क्वारंटाईन कक्षात परावर्तीत करण्यात आले असून ठाण्यात या घटनेने चिंतेचे वातावरण आहे. 

वरळी येथील एका लॅबच्या  डॉक्टरलादेखील बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेल येथील डॉ. महेश मोहिते यांच्या साई हॉस्पिटलमध्येही अमेरिकेतून आलेल्या एका मुलीवर उपचार करण्यात आले. ही मुलगी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्याने हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. या घटना पाहता आरोग्य यंत्रणेलाही संसर्गाचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

सैफी रुग्णालयाचे 85 वर्षाचे कार्डियाक सर्जनचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचे कार्डियाक सर्जन असलेले चिरंजीव आणि अन्य चौघांनाही लागण झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे कोरोनाची बाधा झाली असतानाही डॉक्टरांनी शस्त्रक्रियाही केल्या. त्यामुळे सैफीचा रेडिओलॉजी विभागच सील करण्यात आला आहे. अशीच घटना केईएममध्ये घडल्याने मुंबईतील संकट गंभीर झाले आहे.