Sat, Jul 11, 2020 11:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालिकेच्या ९० सुरक्षा रक्षकांना कोरोना

मुंबई पालिकेच्या ९० सुरक्षा रक्षकांना कोरोना

Last Updated: Jun 02 2020 1:19AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. पालिकेच्या सुरक्षा दलातील तब्बल 90 सुरक्षारक्षक आणि अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला. मात्र अद्यापपर्यंत या कर्मचार्‍यांना पालिकेने 50 लाखांचे विमा संरक्षणही दिलेले नाही.

मुंबई महानगरपालिकेचे 60 कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका पालिका कर्मचार्‍यांना आहे. आतापर्यंत सुमारे 1700 महापालिका कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 40 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या सुरक्षारक्षकांना 24 तास ड्युटी लावण्यात आली आहे. पालिका मुख्यालयासह 24 विभाग कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण, रस्ते, मलनि:सारण, हॉस्पिटल, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालय, राणीबाग, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कार्यालये आदी ठिकाणी पालिका सुरक्षारक्षकांना आपली सेवा बजवावी लागते. 

मुख्यालयासह विभाग कार्यालयाच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वारावर कर्मचारी, अधिकार्‍यांची इन्फ्रारेड थर्मामिटरने तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान अद्याप पर्यंत कोरोनाने मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबाला 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत मृत पावलेल्या कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे हे सानुग्रह अनुदान तातडीने मृतांच्या कुटुंबियांना देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.