Sat, Jul 04, 2020 15:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केवळ स्पर्शाने कोरोना पसरत नाही; हवाई वाहतूक मंत्रालयाचा दावा

केवळ स्पर्शाने कोरोना पसरत नाही; हवाई वाहतूक मंत्रालयाचा दावा

Last Updated: Jun 06 2020 8:34PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या विमानात कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. केवळ स्पर्श केल्याने करोनाचा संसर्ग होत नाही. तर कपड्यांवर पडलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या तोंडातील थेंब अन्य व्यक्तीचा स्पर्श झाल्यावर नाक, तोंड, डोळ्यातून शरीरात गेले तर कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा हवाई वाहतूक मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीने आज उच्च न्यायालयात केला.

परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात घेऊन येताना कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही असा आरोप करत वैमानिक देवेन कनानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. 

मागील सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांनी २३ मार्चच्या डीजीसीएने काढलेल्या परिपत्रकानुसार कोरोनामुळे विमानातील सुरक्षित वावरसाठी तीन पैकी मधले आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश असतानाही परदेशांत अडकलेल्या भारतीयांना आणण्याच्या वंदे भारत मिशनमध्ये एअर इंडियाकडून त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला होता.

तर प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जात नसल्याचा दावा  एअर इंडियासह इंडिगो, गोएअर व स्पाइसजेट या विमान कंपन्यांनी  केला. तर डीजीसीएच्या ३१ मे रोजी नव्या परिपत्रकानुसार विमानातील मधल्या आसनावरील प्रवाशाला किट पुरवण्यासह प्रवाशांना फेस शिल्ड, मास्क इत्यादी देण्याचे तसेच सुरक्षिततेचे अन्य कोटेकार उपाययोजना करण्याचे निर्देश विमान कंपन्यांना देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. उभयपक्षांचा युक्तीवादानंतर तूर्तास विमान कंपन्यांना 31मेच्या परिपत्रकाचे कोटेकार पालन करण्याचे निर्देश देत खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.