होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्लॅटफॉर्मवरील भांडणातसरळ लोकलखाली ढकलले

प्लॅटफॉर्मवरील भांडणातसरळ लोकलखाली ढकलले

Published On: Apr 24 2018 2:02AM | Last Updated: Apr 24 2018 1:55AMमुलुंड : वार्ताहर

प्लॅटफॉर्मवर उद्भवलेल्या क्षुल्लक भांडणातून एखाद्या प्रवाशाला सरळ धावत्या लोकलखाली ढकलून दिले जाऊ शकते, याचा मोठा धक्‍कादायक अनुभव मुलुंड रेल्वे स्थानकाने शनिवारी घेतला. दीपक चमनलाल पटवा (56) हे या भांडणाचे दुर्दैवी बळी ठरले असून, त्यांना लोकलखाली ढकलणार्‍या तीन महिला व त्यांना साथ देणारे अन्य पुरुष प्रवासी सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. 

व्यावसायिक दीपक पटवा हे मुलुंड पश्चिमेतील वालजी लध्धा रोड येथे राहात. ते शनिवारी नेहमीप्रमाणे दुपारी अडीचच्यादरम्यान मुलुंड रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघाले होते. प्लॅटफॉर्मवर उभे असताना गर्दीत कशावरून तरी त्यांची तिथेच उभ्या असलेल्या काही 2महिलांशी शाब्दिक चकमक झडली. त्यांच्या भांडणात काही पुरुषही पडले. या बाचाबाचीचे पर्यवसान धक्काबुक्कीत होत वाद विकोपाला गेला आणि दीपक यांना काही कळण्याच्या आत सरळ लोकलखाली ढकलले गेले. 

लोहमार्ग पोलिसांनी कलम 302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन महिला, एका पुरुषाचा शोध आता घेतला जात आहे. पटवा हे लोखंड खरेदी विक्री करणारे व्यापारी होते. त्यांचा पश्‍चात एक मुलगा, पत्नी, आई असा परिवार आहे. आरोपीना पोलिसांनी कडक शिक्षा करावी, अशी मागणी पटवा यांचे मेव्हणे आणि तक्रारदार अजित शहा यांनी केली आहे.

Tags : Mumbai, Controversy over, platform locals, pushed down, Mumbai news,