Fri, Jul 19, 2019 18:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कंत्राटी अधिकारी, कर्मचारी संघटना एका छत्राखाली

कंत्राटी अधिकारी, कर्मचारी संघटना एका छत्राखाली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मोखाडा : हनीफ शेख

राज्यात गेल्या दीड ते दोन दशकांपासून विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांनी कायम करण्याच्या मागणीसाठी लढा देण्याची तयारी चालवली आहे. या लढ्यासाठी सर्व संघटना एका छत्राखाली एकवटणार आहेत.

कंत्राटी कर्मचार्‍यांच्या समान काम समान वेतन, रिक्त पदांवर सेवासमावेशन, रेग्युलरायझेशन आदी विविध मागण्यांसाठी व्यापक लढा उभारला जाणार असून,  राज्यातील शासनाच्या सर्व विभागांतील कंत्राटी कर्मचार्‍यांनी या ऐतिहासिक लढ्यामध्ये सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कंत्राटी संघर्ष कृती समितीने केले आहे.

गेल्या 15-20 वर्षांपासून राज्यातील  शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसंपदा, पाणलोट आदी विभागांत साधारण 3 लाख कंत्राटी अधिकारी आणि  कर्मचारी कार्यरत आहेत.  त्यांना 11 महिन्यांच्या करारावर, कंत्राटी तत्त्वावर, अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. यात एकट्या पालघर जिल्ह्यातील तब्बल 570 कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. 

त्यांनी आतापर्यंत एच आर पॉलिसी, किमान वेतन, समान काम- समान वेतन आदी मागण्यांसाठी व शासन सेवेत सामावून घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांकडून पाठपुरावा केला आहे. प्रत्येक वेळी निवडणुका जवळ आल्या की, सत्ताधार्‍यांकडून आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याची केवळ आश्वासने देण्यात आली, असा आरोप कंत्राटी संघर्ष समितीने केला आहे. या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्रात विविध न्यायालयात अनेक वर्षांपासून  विविध याचिका देखील प्रलंबित आहेत. 

विधी विभागांतील कंत्राटी अधिकार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेत दि 12 जुलै 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचार्‍यांच्या विरोधात दिलेल्या आदेशाचा आधार घेऊन  राज्य सरकारने सरसकट सर्व विभागांत कार्यरत कंत्राटी कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून न घेण्याचा निर्णय 9 फेब्रुवारी 2018 रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रकाद्वारे घेतला. 

या परिपत्रकात कंत्राटी कर्मचार्‍यांना दर 3 वर्षांनी नव्याने निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात विविध कंत्राटी कर्मचार्‍यांच्या संघटनांकडून उत्स्फूर्त मोर्चे काढण्यात आले.

Tags : mumbai news, Contract officials, employee unions, gather,


  •