होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनधिकृत झोपड्या उभारणीला पुन्हा वेग!

अनधिकृत झोपड्या उभारणीला पुन्हा वेग!

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:38AMमुंबई : प्रतिनिधी

साकीनाका फरसान मार्टसह कमला मिल येथील वन अबव्ह पबला लागलेल्या आगीत 26 जणांचा बळी गेल्यामुळे पालिकेने हॉटेलांच्या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यात फेरीवाले पुन्हा रेल्वे स्टेशन परिसरात बसू नयेत, यासाठी पालिकेची अतिक्रमण निर्मूलन यंत्रणा व्यस्त झाली आहे. त्यामुळे मुंबईत विशेषत: पश्‍चिम व पूर्व उपनगरांत पुन्हा अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे.     
अनधिकृत झोपडपट्टीचे माहेरघर म्हणून मुंबईची ओळख झाली आहे. गेल्या दशकात धारावीपेक्षा मोठ्या झोपडपट्ट्या मानखुर्द, शिवाजी नगर, गोवंडी, बांद्रा, खार, घाटकोपर, मालवणी, मालाड, अंधेरी, दहिसर आदी विभागांत उभ्या राहिल्या आहेत. 

अनधिकृत झोपड्यांच्या तक्रारी आल्यास कोणाची गय केली जाणार नाही, असा दमच आयुक्तांनी भरल्यामुळे साहाय्यक आयुक्तांसह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत. पण कमला मिल व साकीनाक्याच्या फरसान मार्टला लागलेल्या भीषण आगीनंतर पालिकेने हॉटेलांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. 

पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांतील साहाय्यक आयुक्त व अतिक्रमण विभागाचे अधिकारी गुंतल्यामुळे अनधिकृत झोपड्यांवरील कारवाई थंडावली. याचा फायदा उठवत, अनेक झोपडीदादा सक्रिय झाले आहेत. पालिकेने कारवाई केलेल्या बांद्रा, मालवणी, मानखुर्द, गोवंडी, मालाड व दहिसर आदी भागांत पुन्हा झोपड्या उभारण्याचे काम सुरू झाले आहे. 

विशेष म्हणजे याला राजाश्रय मिळत असल्यामुळे तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही. दरम्यान झोपड्या उभारण्याचे काम सुरू असल्याच्या काही तक्रारी आल्या असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी मान्य केले.