Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली

संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:52AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

विरोधकांकडून 26 जानेवारी संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला असताना या रॅलीला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली आहे. पोर्ट ट्रस्टने हा निर्णय राज्य सरकारच्या दबावापोटी घेतला असून सरकार लोकशाही मार्गाने विरोध करण्याचे अधिकारही नाकारत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र, परवानगी नाकारली तरी रॅली काढण्याची तयारी सुरु असल्याने सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डाव्या संघटनांनी एकत्र येत संविधान बचाव रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या रॅलीत शरद पवार यांच्यासह शरद यादव, फारुख अब्दुल्ला, सीताराम येचुरी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर यांच्यासह काँग्रेसचेही बडे नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही जिल्हानिहाय तिरंगा यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारण्यात आली आहे. 

संविधान बचाव रॅलीचा समारोप गेटवे ऑफ इंडियावर होणार होता. मात्र, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य सरकारने तेथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे संविधान बचाव रॅलीला परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

या निर्णयावर नवाब मलिक यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, हा निर्णय राज्य सरकारच्या दबावापोटी घेतला गेला आहे. लोकांना पर्यटनासाठी तेथे जाता येते पण संविधान वाचविण्यासाठी जाण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. हे सरकार घटना बदलायला निघालेच आहे. पण, घटनेने लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा दिलेला अधिकारही नाकारत आहे.