होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लिंग बदल : ललिताला 'मॅट'कडे दाद मागण्याचा सल्ला

लिंग बदल : ललिताला 'मॅट'कडे दाद मागण्याचा सल्ला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

लिंगबदल करून घेण्याच्या शस्त्रक्रियेसाठी रजा मंजूर करण्याबरोबरच पोलीस दलात कायम ठेवण्याबाबत उच्च न्यायालयात धाव घेणार्‍या ललीत उर्फ ललिता साळवेला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागण्याचा सल्ला उच्च न्यायालयाने आज दिला. सर्व्हिस मॅटर असल्याने आधी मॅटकडे दाद मागा, असे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून याचिकेची सुनावणी ३० नोव्हेंबरला ठेवली आहे.

बीड येथील महिला कॉन्स्टेबल ललीत ऊर्फ ललिता साळवे हिच्या वतीने अ‍ॅड. एजाज नकवी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज सकाळी न्यायमूर्ती एम.एस. केमकर आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाच्या निर्दशनास आणून दिली. मात्र न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता दर्शविली सबंधित न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्दश दिले. यामुळे अ‍ॅड. नकवी यांनी न्यायमूर्ती एस.सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाच्या ही याचिका निर्दशनास आणून दिली.

या वेळी न्यायालाने सर्व्हिस मॅटर असल्याने आधी मॅटकडे दाद मागण्याचा सल्ला दिला. मात्र शस्त्रक्रियेसाठी रजा आणि पोलीस दलात कायम ठेवण्यासंदर्भात दाद मागण्याची मॅटमध्ये तरतूद नसल्याचे अ‍ॅड. नकवी यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिल्याने खंडपीठाने याचिकेची सुनावणी गुरुवार दि. ३० नोव्हेंबरला निश्‍चित केली आहे.