Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळजाचा तुकडाच गेल्याने मातेने फोडला हंबरडा

काळजाचा तुकडाच गेल्याने मातेने फोडला हंबरडा

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:15AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

वय वर्षे 31... जळगाव जिल्ह्यातील भडगावमधून अधिकारी पदाची स्वप्ने उराशी बाळगून मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत... डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहरात भाड्याच्या घरात वास्तव्य... शेजार्‍यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध.... मात्र शुक्रवारी दुपारी कर्तव्यावर असताना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. कॉन्स्टेबल गजेंद्र पाटील यांच्या अकाली निधनाची वार्ता कळताच पोलीस दलासह आई लिलाबाई यांनी एकच हंबरडा फोडला. गजेंद्र यांचे सहा महिन्यांपूर्वीच प्रियांका हिच्याशी लग्न झाले होते. मात्र, पतीच्या अशा चटका लावून जाण्याने प्रियांकावरही दुःखाचा जणू पहाडच कोसळला आहे. कॉन्स्टेबल गजेंद्र याच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील भडगाव या मूळगावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेला गजेंद्र पाटील हा पश्चिम डोंबिवलीच्या गरीबाचा वाडा परिसरात असलेल्या विश्वरूप अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरच्या घरात भाड्याने राहत होता. शुक्रवारी दुपारी पोलीस ठाण्यातील एटीसी कक्षात संगणकावर काम करीत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. सहकार्‍यांनी त्याला नूर हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला साडेतीन वाजता मृत घोषित केले. या घटनेचे वृत्त डोंबिवलीत येऊन धडकताच तो राहत असलेल्या विश्वरूप अपार्टमेंटमध्ये शोककळा पसरली. मुंबईत उत्तरीय तपासणी केल्यानंतर डोंबिवलीत आणलेला कॉन्स्टेबल गजेंद्र याचा मृतदेह कुटुंबीयांनी मूळगावी भडगाव येथे नेला. स्थानिक पोलिसांनी सलामी दिल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

8 जून 1985 रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजेंद्र याने बीए पदवीपर्यंत शिक्षण शिक्षण पूर्ण केले. 9 वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठा भाऊ प्रदीप आणि गजेंद्र आई लिलाबाई त्यांचा सांभाळ करत होते. पारूबाई आणि सीतराबाई या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्ने झाली. त्यामुळे प्रदीप आणि गजेंद्र यांच्या डोक्यावरील भार हलका झाला. जालना येथील पोलीस प्रशिक्षण विद्यालयात 30 सप्टेंबर 2009 रोजी प्रशिक्षणासाठी गजेंद्र दाखल झाला. तेथे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर 10 मार्च 2011 रोजी मुंबई पोलीस दलात त्याची नियुक्ती करण्यात आली. आपला मुलगा पोलीस खात्यात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा, अशी आई लिलाबाई यांची महत्त्वाकांक्षा होती. 

पदव्युत्तर शिक्षण घेतलेला गजेंद्र पोलीस खात्यात साधा कर्मचारी असूनही प्रचंड मेहनत घेत होता. 21 एप्रिल 2017 रोजी त्याचे लग्न झाले. प्रियांका नावाने त्याला गुणी पत्नी लाभली. बीए पर्यंत शिक्षण घेतलेली प्रियांका आणि गजेंद्र हे नवदाम्पत्य साईबाबांचे निस्सीम भक्त होते. घरात नेहमीच भक्तीमय वातावरण असे. शेजार्‍यापाजार्‍यांशी सलोख्याचे संबंध असल्याने पाटील दाम्पत्याला इमारतीत खूप मान होता. संगिता फुलोरे-पाटील यांच्या मालकीच्या घरात भाड्याने राहणारा गजेंद्र हा कर्जामुळे तणावात होता. नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात त्याने घर विकत घेतले आहे. त्याच्या कर्जाचे हप्ते पगारातून कापून जात होते. त्यामुळे घरात पैशांची टंचाई होती, अशी माहिती त्याच इमारतीतील पत्रोस डिसोजा यांनी दिली.