होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राहुल गांधींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग 

राहुल गांधींनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग 

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:49AMमुंबई : प्रतिनिधी

गुजरातमध्ये थोडक्यात वाचले, कर्नाटकमध्ये हरले, आता मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपा दिसणार नाही. 2019 मध्ये  मुंबई, महाराष्ट्र, संपूर्ण देशात काँग्रेस आणि विरोधक भाजपाला निवडणुकीत हरविल्याशिवाय राहणार नाहीत, असा आत्मविश्‍वास व्यक्त करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी निवडणूक प्रचाराचे रणशिंग मुंबईत फुंकले. 

मुंबईत गोरेगाव येथे काँग्रेेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश, अशोक गेहलोत आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई काँग्रेसच्या वतीने शंकराची मुर्ती देऊन राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. 

माझा सर्वांना नमस्कार, आपण सगळे कसे आहात, असे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. मुंबईचे महत्व सांगत त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वावरच हल्ला चढविला. भाजपाकडून देशातील जनतेची फसवणूक झाली असून येणार्‍या निवडणुकीत लोक काँग्रेसच्या बाजुने उभे राहतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 2019 मध्ये होणार्‍या निवडणुकीत काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष भाजपाचा पराभव करतील. पंतप्रधान मोदी यांची देहबोली बघा, त्यांच्या आवाजात अलीकडे घबराट दिसते. त्यांच्यापेक्षा अमित शहा हे अधिकच घाबरलेत त्यामुळे त्यांची पळापळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

निरव मोदी 35 हजार कोटी, विजय मल्ल्या 9 हजार कोटी, ललीत मोदी देशातील जनतेचे कोट्यावधी रुपये घेऊन पळून गेले. पण देशाचे पंतप्रधान मोदी काहीच करू शकले नाहीत, असे राहुल गांधी यांनी म्हणताच प्रेक्षकांमधून ते सुद्धा पळून जातील असा आवाज आला. त्यावर राहुल यांनी हो नरेंद्र मोदी देखील एक दिवस देशातून निघून जातील असा टोला लगावला. निवडणुकीपुर्वी मोदी म्हणाले होते की, मी देशाचा चौकीदार बनणार आहे. पण निवडून आल्यावर मोदी हे देशातील 15 ते 20 उद्योगपतींचेच चौकीदार झालेत, त्यांना सर्वसामान्य जनतेची चिंता नाही, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसने देशाला काय दिले असे भाजपा व संघाच्या लोकांकडून विचारले जाते. काँग्रसच्या काळात कुणाला घाबरवले, धमकावले जात नव्हते. कुणाचा जात, धर्म आणि रंग पाहिला जात नव्हता. पण आज माध्यमांत देखील सरकाबाबत घबराट निर्माण झाली आहे. चार वर्षात भाजपा, मोदी सरकार आणि संघाने मुंबई हिंदुस्थानला काय दिल? दरवर्षी 2 कोटी युवकांना रोजगार देण्याच्या आश्‍वासनाच काय झाल? शेजारील चीनसारखा देश चोवीस तासात 50 हजार लोकांना रोजगार देऊ शकतो, पण भारत रोजगारात मागे पडत चालला आहे. देशातल्या तरुणांना रोजगार हवा आहे, पण पंतप्रधान त्यांना रोजगार न देता आपापसात लढवत असल्याची टीका त्यांनी केली. 

अरूण जेटली म्हणतात कर्जमाफीच कोणतही धोरण नाही. भाजपचे अध्यक्ष म्हणतात शेतकर्‍यांचे कर्जमाफ करणे आमच्या धोरणात नाही. दुसरीकडे मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात हे भाजपचे वास्तव आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय  पंतप्रधानांनी हसत हसत घेतला, पण या निर्णयामुळे मुंबई तसेच देशातील सर्वसामान्यांना किती त्रास झाला. हातावर पोट असणार्‍यांचे काय याचा विचार त्यांनी केला नाही. नोटाबंदी, जीएसटी चा अनेकांना फटका बसला पण अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीला काहीच फरक पडला नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी भाजपा चुकीच्या धोरणांचा व निर्णयांचा चांगलाच समाचार घेतला. 

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारने देशातील युवकांना, गरिबांना आणि शेतकर्‍यांना धोका देण्याचे काम केले आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात असंतोष पसरला आहे. भाजप आणि आरएसएस च्या लोकांकडून देशात सुरू असलेल्या कारवायांना काँग्रेसच चोख उत्तर देऊ शकते, असे सांगत राहुल गांधी भाजप विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सावरकर जेव्हा इंग्रजांची माफी मागत होते, हात जोडून माफ करा असे सांगत होते, तेव्हा काँग्रेसचे नेते तुरुंगात खितपत पडले होते, 15 ते 20 वर्षांची शिक्षा भोगत होते. आमच्या कार्यकर्त्यांनी बलिदान दिले, अस राहुल गांधी म्हणाले. भाजप, संघाने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका ही समाज संघटित करण्याचीच राहिली पाहिजे, असे ते म्हणाले.