Wed, Mar 27, 2019 06:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्रात झालेली 16 लाख कोटींची गुंतवणूक गेली कुठे?

महाराष्ट्रात झालेली 16 लाख कोटींची गुंतवणूक गेली कुठे?

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

आघाडी सरकारच्या काळात उद्योग व गुंतवणूकीत अग्रेसर असणारा महाराष्ट्र भाजप-शिवसेना सरकारच्या काळात 13 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेली महाराष्ट्रात झालेली 8 लाख कोटी आणि 16 लाख कोटींची गुंतवणूक गेली कुठे ? असा प्रश्‍न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

व्यवसायासाठी सुलभ राज्यांच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 10 राज्यांतही स्थान मिळवू शकला नाही. आंध्र प्रदेश, तेलंगाणा, हरियाना, झारखंड, छत्तीसगड या राज्यांची कामगिरी महाराष्ट्रापेक्षा सरस राहिली. यावरून मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यात कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे चित्र उभे करून सरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे. गुंतवणुकीबाबत खोटे दावे करणार्‍या मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी देशातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक  गुंतवणूक राज्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी काँग्रेस पक्षाने केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सरकारचा खोटेपणा उघड करून महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीत पिछाडीवर गेल्याचे दाखवले होते. त्यावेळी उद्योगमंत्री देसाई तसेच भाजपा प्रवक्ते राम कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटी आकडेवारी सादर करत काँग्रेसला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला होता. 

व्यवसाय सुलभते संदर्भात जाहीर करण्यात आलेल्या अहवालातून महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीत पिछाडीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सावंत म्हणाले.